![]()
मोर्शी येथील माडू नदीपात्रात स्कॉलर्स प्वाईंट इंग्लिश स्कूलचे सचिव गजानन उद्धवराव शहाणे (वय ५५, रा. दुर्गानगर, मोर्शी) यांचा मृतदेह आढळून आला आहे. शनिवार सकाळपासून बेपत्ता असलेल्या शहाणे यांचा मृतदेह अमरावती येथील शोध व बचाव पथकाच्या जवानांनी रविवारी बाहेर काढला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन शहाणे शनिवारी सकाळी नऊ वाजता घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते. ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शनिवारी सायंकाळी मोर्शी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मोर्शी-वरुड रोडवरील माडू नदीच्या मध्यभागी एक मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शोध व बचाव पथकाचे व्यवस्थापक सुरेंद्र रामेकर यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ एक पथक घटनास्थळी पाठवले. घटनास्थळी पोहोचलेल्या आपदा मित्रांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली लाइफ जॅकेट, दोरी आणि बांबूच्या स्ट्रेचरच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी आपदा मित्र सागर तायडे, प्रियंशू तायवाडे, विवेक सावरकर यांच्यासह पोलीस व महसूल प्रशासनाने सहकार्य केले. गजानन शहाणे यांनी आत्महत्या केली की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन उकंडे, स्कॉड विभागाचे स्वप्निल बायस्कर, छत्रपती करपते, शेखर वाडीभस्मे, अथर्व कोहळे आणि प्रितेश कांबळे करत आहेत.
Source link
स्कॉलर्स प्वाईंट सचिवांचा मृतदेह माडू नदीपात्रात आढळला:आत्महत्या की इतर कारणे? पोलिस तपास सुरू