![]()
शनिवार-रविवार लागून आलेल्या शासकीय सुट्ट्या आणि श्रावणातील तिसरा सोमवार यांच्या सुरेख योगायोगामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वेरूळ येथे भाविकांचा अथांग महासागर लोटल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन दिवसांत सुमारे ८३ हजारांहून अधिक शिवभक्तांनी बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन धन्यता मानली, तर लाखो भाविकांनी पवित्र तीर्थकुंडावरून पायी जात पिनाकेश्वर महादेवाला जलाभिषेक केला. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिरामुळे हे क्षेत्र धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने नेहमीच गजबजलेले असते. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी पिनाकेश्वर (मोठा महादेव) येथे जलाभिषेक करण्याची जुनी परंपरा आहे. यासाठी शनिवार रात्रीपासूनच हजारो शिवभक्तांनी वेरूळ येथील पवित्र शिवालय तीर्थकुंडावर पाणी भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. हर हर महादेव आणि जय भोलेच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविक वेरूळ येथून पळसवाडी, गल्लेबोरगाव, टाकळी, जवळी, विटा, आवराळा, बोलठाण आणि जातेगाव मार्गे पायी जात पिनाकेश्वर पहाडावर पोहोचले. दोन दिवसांत सुमारे दोन लाख भाविकांनी पिनाकेश्वरला जलाभिषेक केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.यात्रेच्या पार्श्वभूमीवर पायी जाणाऱ्या भक्तांसाठी पाणी वाहण्यासाठी सुकवलेले भोपळे, सजवलेल्या काठ्या, पूजा साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्याचे मंत्री अतुल सावे व देवस्थान ट्रस्टच्या वतीने ५०० लिटर क्षमतेच्या शुद्ध व थंड पाणी यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. पायी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी दानशूर शिवभक्तांनी चहा, फराळ, महाप्रसादाची सोय केली होती. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.
Source link
वेरूळला दोन दिवसांमध्ये 83 हजार भाविकांनी घेतले श्री घृष्णेश्वराचे दर्शन:तीर्थकुंडावरून पायी जात पिनाकेश्वर महादेवाला जलाभिषेक