Headlines

पैठण शहरात 100 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात:सीटीस्कॅनपासून अतिदक्षता कक्षापर्यंत अत्याधुनिक सुविधा‎




तब्बल तीन दशकांपासून कागदोपत्री अडकलेले पैठण येथील १०० खाटांच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न आता अखेर प्रत्यक्षात उतरत आहे. शहरासह संपूर्ण तालुक्यातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा मुख्य आधार ठरणार्या या महत्त्वाकांक्षी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. तत्कालीन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या विशेष प्रयत्नातून या प्रकल्पासाठी ४३ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे रखडलेल्या कामाला मोठी गती मिळाली आहे. हे रुग्णालय प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्यानंतर पैठणच्या आरोग्य व्यवस्थेला मोठी उभारी मिळेल, असा विश्वास आमदार विलास भुमरे यांनी व्यक्त केला आहे. पैठण येथील सध्याचे ३० खाटांचे ग्रामीण प्रशिक्षण रुग्णालय वाढती लोकसंख्या आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत अत्यंत अपुरे पडत होते. गंभीर आजार, जटिल प्रसूती, मोठ्या शस्त्रक्रिया किंवा विशेष तपासण्यांसाठी रुग्णांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे नव्या सुसज्ज रुग्णालयाची गरज अनेक वर्षांपासून अधोरेखित होत होती. आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधुनिक पद्धतीने उभारण्यात येत असलेल्या या भव्य इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून निर्धारित वेळेत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या नव्या रुग्णालयात केवळ खाटांची संख्या वाढणार नसून, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रपाठक डॉ. गौतम सव्वाशे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात अतिदक्षता कक्ष, प्रसूती सेवा, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, सोनोग्राफी, सीटीस्कॅन यांसारख्या उच्च दर्जाच्या तपासण्या व उपचारांची सोय असेल. रुग्णालयाच्या सुरळीत संचालनासाठी ५० ते ६० तज्ज्ञ डॉक्टर आणि सुमारे ३०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे, ज्यामुळे तालुक्यातील आरोग्यसेवेचा संपूर्ण कायापालट होईल. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. पर्यटकांसाठी ठरणार मेडिकल बॅकअप पैठण हे संत एकनाथ महाराज मंदिर, नाथसागर आणि संत ज्ञानेश्वर उद्यानामुळे धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. येथे वर्षभर भाविक, पर्यटकांची मोठी वर्दळ असते. आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांनाही उच्च दर्जाचे उपचार मिळावेत, यासाठी हे रुग्णालय एक मेडिकल बॅकअप ठरेल, असा विश्वास नगराध्यक्ष विद्या कावसानकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष पवन लोहिया व बलराम लोळगे यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *