Headlines

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची अचानक एन्ट्री:नेत्यांच्या जेवणाचे नमुने घेतले, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण




राज्यात सध्या भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मंत्रालयातील खानावळीपासून हॉटेल्स आणि विविध खाद्य आस्थापनांवर तपासण्या करत FDA कडून नमुने घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या ठिकाणी FDA पथकाने अचानक भेट देत नेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी विविध अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा केंद्रात सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी आणि राज्यभरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. या बैठकीसाठी उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. बैठकीदरम्यान FDA पथकाची अचानक एन्ट्री बैठक सुरू असतानाच FDA चे पथक अचानक बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, FDA चे चार कर्मचारी कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि नेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाची पाहणी केली. त्यानंतर पथकाने काही अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले. FDA पथकाच्या या अचानक भेटीमुळे बैठकीच्या ठिकाणी उपस्थितांमध्येही उत्सुकता निर्माण झाली. भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आणि त्यातील राजकीय चर्चेपेक्षा सध्या नेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाच्या तपासणीचीच अधिक चर्चा होत आहे. नमुन्यांमध्ये काय आढळले? FDA अधिकाऱ्यांनी घेतलेल्या अन्नपदार्थांच्या नमुन्यांमध्ये नेमके काय आढळले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, प्राथमिक तपासणीदरम्यान कोणताही आक्षेपार्ह प्रकार आढळला नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनीही FDA चे अधिकारी कार्यक्रमस्थळी आले होते आणि त्यांनी अन्नपदार्थांची तपासणी केल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी जेवणाचे नमुने घेतले असून, तपासणीदरम्यान त्यांना काही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे आंबेकर यांनी म्हटले आहे. अंतिम अहवालानंतरच नमुन्यांबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. राज्यभर FDA ची भेसळविरोधात मोहीम राज्यात सध्या अन्नपदार्थांमधील भेसळ, निकृष्ट दर्जा आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन याविरोधात FDA कडून तपासणी आणि कारवाई सुरू आहे. विविध हॉटेल्स, खानावळी तसेच खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे भाजपसारख्या सत्ताधारी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीच्या ठिकाणीही FDA पथक पोहोचल्याने या कारवाईला विशेष राजकीय संदर्भ प्राप्त झाला आहे. मात्र, ही तपासणी नियमित अन्नसुरक्षा तपासणीचा भाग होती की विशेष कारणास्तव करण्यात आली, याबाबत अधिकृतपणे स्पष्टता झालेली नाही. रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच प्रदेश कार्यकारिणी बैठक प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेली ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणीची मोठी बैठक आहे. त्यामुळे भाजपच्या संघटनात्मक आणि आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीला केंद्रीय आणि प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा प्रभारी, विविध मोर्चांचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष तसेच माजी खासदार आणि माजी आमदार उपस्थित आहेत. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. आगामी संघटनात्मक कार्यक्रम, राज्यातील राजकीय परिस्थिती, सामाजिक विषय आणि पक्षाच्या पुढील वाटचालीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे ठरावही या बैठकीत मांडले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस करणार मार्गदर्शन बैठकीच्या समारोपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी काळातील पक्षाची भूमिका आणि संघटनात्मक कामकाजाबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व राजकीय घडामोडींमध्ये बैठकीच्या ठिकाणी FDA पथकाची अचानक झालेली एन्ट्री आणि नेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाचे घेतलेले नमुने हा सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे. नमुन्यांचा अंतिम अहवाल काय येतो, याकडे आता लक्ष लागले आहे. हेही वाचा.. पंतप्रधानांचा अपमान केलाय, अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करा:भाजपच्या मागणीवर ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले- महाराजांसाठी दुसरा गुन्हा दाखल झाला तरी चालेल पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला मनसे नेते अमित ठाकरे यांनी केलेल्या विरोधानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *