![]()
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे देशभरात चिंतेचे वातावरण असताना, नाशिककरांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नेपाळ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे 200 यात्रेकरू सुखरूप असून, 1 सप्टेंबर रोजी ते नाशिकमध्ये परतणार आहेत. श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या चोख नियोजनामुळे आणि सेवेकऱ्यांच्या तत्परतेमुळे या भाविकांची सुखरूप सुटका झाली आहे. श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट, नाशिक यांच्या वतीने दरवर्षी अत्यंत अल्प दरामध्ये दत्त पादुकांसह तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षीही ट्रस्टच्या माध्यमातून 200 भाविक नेपाळ यात्रेसाठी गेले होते. मात्र, नेपाळमध्ये अचानक उद्भवलेली पूरस्थिती आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे यात्रेकरू तिथेच अडकून पडले. या घटनेची माहिती मिळताच नाशिकमधील त्यांच्या नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला होता आणि सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशा कठीण आणि आणीबाणीच्या प्रसंगी ट्रस्टच्या सेवेकऱ्यांनी मोठे धाडस आणि प्रसंगावधान दाखवले. त्यांनी त्वरित नेपाळमधील स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून उत्तम समन्वय राखला. यानंतर सर्व 200 भाविकांना तातडीने एका सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तिथे त्यांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची आणि राहण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली, ज्यामुळे घाबरलेल्या भाविकांना मोठा आधार मिळाला. सध्या हे सर्व भाविक पूर्णपणे सुरक्षित असून ते नाशिकच्या परतीच्या प्रवासाला लागले आहेत. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता मुंबई नाका येथे या सर्व भाविकांचे आगमन होणार आहे. या महाभयंकर संकटातून सुखरूप परतणाऱ्या यात्रेकरूंचे श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सुखरूप परतीच्या बातमीमुळे नातेवाईकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.
Source link
नेपाळच्या महापुरातून नाशिकचे 200 भाविक सुखरूप बचावले:स्थानिक प्रशासनाच्या मदतीने भाविकांना सुरक्षित स्थळी हलवले