![]()
राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त आणि निकृष्ट खाद्यपदार्थांवर कठोर कारवाईचा धडाका सुरू आहे. अनेक हॉटेल्स आणि दुकानांना सील ठोकण्यात आल्याने कारवाईचा धसका अनेकांनी घेतला आहे. मात्र, असे असतानाच नवी मुंबईत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एका अत्यंत गंभीर प्रकाराचा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. विविध नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील मॅन्युफॅक्चरिंग डेट, ‘बेस्ट बिफोर’ आणि ‘एक्सपायरी डेट’मध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून त्याच खाद्यपदार्थांची पुन्हा विक्री आणि निर्यात केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कालबाह्य झालेल्या उत्पादनांवर नवीन तारखा टाकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या या मोठ्या रॅकेटवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तुर्भेतील गोदामावर छापा नवी मुंबई गुन्हे शाखेने तुर्भे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एका गोदामावर धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईदरम्यान जुन्या तारखा पुसून पॅकेटवर नव्या तारखा छापण्यासाठी ‘डेट प्रिंटिंग मशीन’चा वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या कारखान्यावर संयुक्त कारवाई केली. दोन कोटींहून अधिक मालाची तपासणी गेल्या सहा दिवसांत करण्यात आलेल्या या सखोल तपासणीत एकूण 18 निर्यातदारांचा सुमारे 2 कोटी 46 लाख 53 हजार 354 रुपयांचा माल तपासण्यात आला. त्यापैकी 11 निर्यातदारांच्या सुमारे 75 लाख 21 हजार 269 रुपयांच्या मालावर फेरफार झाल्याचे निष्पन्न झाले. या मालावरील मूळ लेबल, उत्पादन तारीख, एक्सपायरी तारीख, बॅच नंबर आणि एमआरपीमध्ये बदल करण्यात आल्याचे उघड झाले. दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तारखा छापण्याची मशीन आणि विविध कंपन्यांचे खाद्यपदार्थ असा एकूण 75 लाख 21 हजार 269 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात जयप्रकाश संचतीराम सिंग (27) आणि जया नवरंग बहादूर सिंग (26) या दोन आरोपींसह संबंधित 11 निर्यातदार कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास नवी मुंबई गुन्हे शाखेचा मध्यवर्ती कक्ष करत आहे.
Source link
एक्सपायरी डेट बदलून ग्राहकांच्या जीवाशी खेळ!:नवी मुंबईत धक्कादायक रॅकेट उघडकीस, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई