मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक आणि भावुक प्रसंग घडला. आंदोलनाची समजूत काढण्यासाठी गेलेल्या जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जरांगे पाटील यांच्यात
.
‘तो’ संवाद आणि उपोषणस्थळावरील शांतता
जालन्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाने आरक्षणाबाबत आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सुरुवात केली. यावर काहीसे वैतागून जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही सरकारची बाजू घ्यायला आला आहात का? सरकारमुळे चांगल्या चांगल्यांवर फाशी घेण्याची वेळ आली आहे.”
जरांगेंच्या बोलण्याचा रोख स्वतःकडे समजून जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या, “मनोजजी, नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरीही माझी तयारी आहे.” या अनपेक्षित उत्तराने संपूर्ण उपोषणस्थळी एका क्षणात शांतता पसरली.
‘मंत्र्यांना यूपीएससीची पुस्तकेही वाचता येणार नाहीत’
जिल्हाधिकाऱ्यांच्या या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना थांबवून समजावले. “तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही फाशी घेण्याची भाषा बोलू नका. हा प्रश्न सुटला नाही तर तुमच्यावर नाहक टीका होईल. तुम्ही कशाला यात पडताय? तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून, परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठी झालेली मुले आहात. शासन व्यवस्थेत बसलेल्या काही लोकांना तर तुमची यूपीएससी आणि एमपीएससीची पुस्तकेही वाचता येणार नाहीत. ते स्वतःचे अपयश लपवण्यासाठी तुम्हाला पुढे करत आहेत. तुम्ही तुमची ऊर्जा इथे वाया घालवू नका.”
“या सर्व मागण्या राज्य पातळीवरील धोरणात्मक निर्णय आहेत, त्यात जिल्हा प्रशासनाचा थेट संबंध नाही. त्यामुळे यापुढे तुम्ही येऊ नका,” असे सांगताना जरांगे यांचे डोळे पाणावले.
आरक्षणापासून एक इंचही मागे हटणार नाही: जरांगे
जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका अधिक आक्रमक करत सरकारला थेट इशारा दिला. “एका दिवसात शिबिरे आयोजित केली जाऊ शकतात, मग निर्णय घेण्यासाठी महिन्यांचा कालावधी कशाला हवा? सातारा आणि कोल्हापूर संस्थानांचे गॅझेट तात्काळ लागू करून शासन निर्णय (GR) काढावा. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जात नसतील तर समोरच्यांवरही गुन्हे दाखल करा. मी माझ्या भूमिकेपासून एक इंचही मागे हटणार नाही.”
दरम्यान, 12 सप्टेंबरला मुंबईत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी आंदोलक तरुणांना आझाद मैदानावर गर्दी न करता नियोजनबद्ध पद्धतीने मुंबईकडे कूच करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘संवाद सुरूच राहील’; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
चर्चेनंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “प्रशासकीय चौकटीत राहून जे शक्य आहे ते सर्व करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. 58 लाख नोंदींशी संबंधित डेटा आम्ही सोबत आणला आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असून त्यांनी उपोषण मागे घ्यावे किंवा किमान पाणी तरी प्यावे, अशी आमची विनंती आहे. शासन आणि प्रशासन पातळीवरून हा संवाद पुढेही सुरू राहील. दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील आणि मकरंद आबा पाटील यांचा समावेश असलेले मंत्र्यांचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत पोहोचून जरांगे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..
LIVE मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5 वा दिवस:जरांगेंची प्रकृती खालावली, पण भूमिकेवर ठाम, अनेक जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असतानाही जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मंगळवारी रात्री जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. येथे वाचा संपूर्ण बातमी