![]()
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, विमानतळावर प्रवाशांना घेण्यासाठी येणाऱ्या ओला, उबरसह इतर टॅक्सी वाहनांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. यामुळे दररोज १२ ते १५ लाख रुपयांची जादा वसुली होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शेट्टी यांनी त्यांचा अनुभव सांगितला. दिल्लीहून रात्री दोन वाजता पुणे विमानतळावर आल्यावर त्यांनी टॅक्सी बुक केली. विमानतळापासून शासकीय विश्रामगृहापर्यंतचे ऑनलाइन भाडे ३५० ते ३७५ रुपये होते. मात्र, विमानतळाच्या गेटवरून टॅक्सीने प्रवाशाला घेऊन जाण्यासाठी ६५० रुपये द्यावे लागले. चौकशी केल्यावर त्यांना समजले की, गेटवरून प्रवासी घेतल्यास अतिरिक्त शुल्क लागते. हे शुल्क टाळण्यासाठी विमानतळापासून ६०० मीटर दूर असलेल्या एरोमॉलमध्ये जावे लागते. प्रवाशांकडे सामान आणि बॅगा असल्याने रात्रीच्या वेळी ६०० मीटर चालत जाणे अनेकांना शक्य नसते. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने हे अतिरिक्त शुल्क भरावे लागते, असे शेट्टी म्हणाले. त्यांच्या माहितीनुसार, ६५० रुपयांच्या भाड्यात ३७५ रुपये टॅक्सी कंपनीचे मूळ भाडे असते, तर २७५ रुपये टर्मिनल शुल्क असते. यातून ओला, उबर किंवा इतर कंपन्या २५ ते ३० टक्के कमिशन घेतात. इंधन, वाहन देखभाल, कर्जाचा हप्ता आणि चालकाचा खर्च वजा केल्यावर टॅक्सीचालकाच्या हातात खूप कमी पैसे उरतात. या संपूर्ण व्यवस्थेत मोठी मक्तेदारी तयार झाली असून प्रवासी आणि टॅक्सी व्यावसायिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. या कंत्राटांमध्ये काही राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहभागी असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. मात्र, त्यांनी या आरोपांचे कोणतेही पुरावे सार्वजनिक केलेले नाहीत. विमानतळ प्राधिकरणाने या शुल्काबाबत पारदर्शक माहिती जाहीर करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
Source link
पुणे विमानतळावर प्रवाशांकडून दररोज 12 ते 15 लाखांची अतिरिक्त वसुली:राजू शेट्टींचा आरोप; ओला-उबरसह टॅक्सीचालकांवरही अन्याय होत असल्याचा दावा