Headlines

नागपुरात डीजे बंदीवरून भाजपमध्येच "ध्वनी'प्रदूषण:शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि आमदार प्रवीण दटके यांनी संदीप जोशींविरोधी भूमिका घेतली




नागपूर शहर पोलिसांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डीजे, डॉल्बी आणि बीम-लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे. या बंदीवरून नागपूर भाजपमध्ये अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि आमदार प्रवीण दटके यांनी डीजे बंदीचे समर्थक माजी आमदार संदीप जोशी यांच्या भूमिकेविरोधात आवाज उठवला आहे. दयाशंकर तिवारी आणि प्रवीण दटके यांनी डीजे आणि साऊंड सिस्टिमवर पूर्ण बंदी घालण्याऐवजी आवाजाची डेसिबल मर्यादा निश्चित करण्याची मागणी केली आहे. ही मर्यादा सर्वांना समान लागू करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत ३ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत डॉल्बी, मल्टीस्पीकर आणि लेझर लाईट्सच्या वापरावर बंदी घालण्याची अधिसूचना काढली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सरसकट बंदीवर पुन्हा विचार करण्याची मागणी केली. साऊंड व्यवसायावर हजारो कुटुंबांचा रोजगार अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. तिवारी म्हणाले की, बंदीऐवजी ध्वनी प्रदूषण नियम २००० नुसार आवाजाची मर्यादा ठरवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी. हा नियम फक्त विशिष्ट सणांपुरता मर्यादित न ठेवता वर्षातील सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांना समान असावा, असा युक्तिवाद त्यांनी केला. दुसरीकडे, आमदार प्रवीण दटके यांनी थेट “हिंदू सणांच्या काळातच ही बंदी का?” असा प्रश्न विचारत आक्रमक भूमिका घेतली. बंदी आणायचीच होती, तर ती १ जानेवारीपासून का लागू केली नाही, असा सवालही त्यांनी केला. डीजे बंदीला समर्थन देणारे माजी आमदार संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे मानले जातात. अशा परिस्थितीत, पक्षाचे शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदाराने जोशी यांच्या भूमिकेच्या विरोधात जात पोलीस प्रशासनाच्या आदेशाविरोधात आवाज उठवल्यामुळे नागपूर भाजपमधील अंतर्गत वाद स्पष्टपणे समोर आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *