![]()
ईद-ए-मिलाद मिरवणुकीत मोठ्या आवाजाचे लाऊडस्पीकर वापरल्याबद्दल मंडळाच्या अध्यक्षांसह तिघांना शिक्षा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने हा निर्णय दिला. हे प्रकरण लोहियानगरमधील एका मंडळाशी संबंधित आहे. अल मदिना यंग बॉईज यंग सर्कलचे अध्यक्ष वाहिद कासीम मणियार आणि उपाध्यक्ष जावेद मजीद शेख यांना शिक्षा झाली आहे. हे दोघेही लोहियानगर, घोरपडे पेठ येथील रहिवासी आहेत. लाऊडस्पीकर देणारे व्यावसायिक प्रकाश कृष्णात अस्वले (रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनाही शिक्षा झाली आहे. 26ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी लाऊडस्पीकर वापरण्याबाबत पोलिसआयुक्त अमितेशकुमार यांनी आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. तरीही, लोहियानगर येथील अल मदिना यंग बॉईज सर्कलकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या आवाजाचे लाऊडस्पीकर वापरण्यात आले. खडक पोलिसांनी लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या. मात्र, न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत. त्यामुळे खडक पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांसह तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 223 आणि 292 नुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच, खडक पोलिसांनी 24 तासांच्या आत न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. न्यायालयाने मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लाऊडस्पीकर पुरवठादार व्यावसायिकाला दोषी ठरवून शिक्षा दिली, अशी माहिती झोन एकचे पोलिस उपायुक्त हृषीकेश रावले यांनी दिली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे आणि उपायुक्त रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय पिंगळे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक शर्मिला सुतार, समाधान पवार, सहायक निरीक्षक अमोल वळसंग, स्वप्नील बनकर, राजाराम गाढवे, भूषण चव्हाण आणि कल्याण घोरपडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Source link
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान भोवला:लोहियानगरमधील मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्षांना पुणे न्यायालयाकडून शिक्षा