Headlines

पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणारे अटकेत:मार्केटयार्डमधील 30 लाखांच्या लुटीचाही उलगडा; 24 लाखांचा मुद्देमाल जप्त




व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याच्याकडील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान मार्केटयार्ड परिसरात व्यापाऱ्याची ३० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लुटल्याचाही उलगडा झाला असून, पोलिसांनी २४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली. यश प्रवीण सोनवणे (वय २४, रा. मांजरी) आणि निहाल नवनाथ अडागळे (वय १९, रा. मुंढवा) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्यासह एका साथीदारालाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास फिर्यादी पाच लाख रुपये रोख घेऊन सॅलिसबरी पार्क परिसरातून जात होते. त्यावेळी तीन जणांनी त्यांचा पाठलाग करून धारदार लोखंडी शस्त्राने हल्ला केला. फिर्यादीला जखमी करून पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रोकड लुटण्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी मार्केटयार्ड, बिबवेवाडी, वानवडी, कोंढवा, हडपसर, मगरपट्टा सिटी, केशवनगर आणि मुंढवा परिसरातील सुमारे ३०० ते ३५० सीसीटीव्ही चित्रीकरणांची महिनाभर तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशयिताला मुंढवा येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर इतर साथीदारांचाही शोध लागला. चौकशीत ७ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वाएकच्या सुमारास मार्केटयार्ड रस्त्यावर व्यापाऱ्याची ३० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लुटल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात आणखी तीन साथीदारांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयितांकडून गुन्ह्यांसाठी वापरलेली वाहने, कपडे व मोबाईल तसेच रोकडीतून खरेदी केलेली आय-२० कार, बुलेट दुचाकी, मोबाईल, साडेचार तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे तोडे आणि घड्याळे जप्त करण्यात आली. त्याचबरोबर सहा लाख ५० हजार रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल शेळके, उपनिरीक्षक बाळू शिरसट आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *