![]()
“भाजप निवडणुका जिंकण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन डावपेच खेळत आहे. मतदार याद्यांमधून लाखो नावे वगळायची आणि बोगस नावे घुसवून फेरफार करायचा, असाच कारभार सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत गाफील न राहता प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील मतदार यादी तोंडपाठ ठेवून नावानिशी आणि चेहऱ्यानिशी प्रत्येक मतदारावर करडी नजर ठेवली पाहिजे,” असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील सुमारे 250 बूथ लेव्हल एजंट्सनी (बीएलए) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळागाळातील पक्षसंघटन मजबूत करणे आणि निवडणूक नियोजनाची रणनीती आखणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे, अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. 45 लाख बोगस मतदारांची नोंद; दोन कोटी नावे वगळण्यात काय काळंबेरं? निवडणूक यंत्रणा आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने मोठे यश दिले; मात्र त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल वेगळे लागले. बोगस मतदार नोंदणीबाबत सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने म्हणजेच अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी आवाज उठवला होता. लोकसभा ते विधानसभा या अवघ्या सहा महिन्यांच्या काळात तब्बल 45 लाख मतदार वाढवले गेले, ही वस्तुस्थिती आहे.” एसआयआर (SIR) प्रक्रियेत घोळ “आताच्या पडताळणीत राज्यातून तब्बल दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे वगळली गेल्याचे समोर येत आहे. ही नावे कोणाची वगळली आणि आता त्यांच्या जागी कोणाची नावे घुसवली जात आहेत? बोगस मतदारांना सामावून घेण्याचा हा नवा डाव असू शकतो.” “चार दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघरमध्ये एका झेरॉक्स सेंटरवर भाजपचे कार्यकर्ते एसआयआर (SIR) चे शेकडो बोगस फॉर्म झेरॉक्स करताना आपल्या शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडले. सुरुवातीला पोलीस गुन्हा नोंदवण्यास तयार नव्हते; मात्र शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करावा लागला. नागपूरमध्येही भाजपच्या जबाबदार नेत्यांच्या नावावर हॉटेलांमधील खोल्या बुक करून अशाच प्रकारे माणसांकडून फॉर्म भरून घेतले जात होते. युवासेनेने हा भंडाफोड केला.” कार्यकर्त्यांचा विमा; शिवसेनाप्रमुखांची परंपरा पुढे नेली बीडमधील कार्यकर्त्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष विमा योजनेचे ठाकरे यांनी भरभरून कौतुक केले. “शिवसैनिक स्वतःचे घरदार आणि कुटुंब बाजूला ठेवून पक्षासाठी, जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस झोकून देऊन काम करत असतो. अशा वेळी दुर्दैवाने काही अघटित घडल्यास त्याचे कुटुंब वाऱ्यावर पडू नये म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या विम्याची योजना सुरू केली होती. बीडच्या पदाधिकाऱ्यांनी हीच योजना ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाने अधिक चांगल्या पद्धतीने पुनरुज्जीवित केली आहे.” ही योजना केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित न ठेवता ती राज्यभरातील सर्व शिवसैनिकांसाठी आणि बीएलए कार्यकर्त्यांसाठी लागू केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बीड पुन्हा भगवा करण्याची संधी; युतीत आपले नुकसान झाले बीड जिल्ह्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी भाजपसोबतच्या जुन्या युतीवर भाष्य केले. “स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे अतिशय घट्ट कौटुंबिक संबंध होते. त्यावेळची युती आजच्यासारखी कपटी नव्हती. त्यांच्या प्रेमाखातर आपण बीड जिल्ह्यातील जागा भाजपला सोडत गेलो; मात्र त्याचा दुष्परिणाम असा झाला की बीडमध्ये शिवसेनेचे अस्तित्व कमी होत गेले.” “आता ती चूक दुरुस्त करून संपूर्ण बीड जिल्हा पुन्हा एकदा भगवा करण्याची नामी संधी चालून आली आहे. गद्दारी करणाऱ्यांची ती ‘शहासेना’ आहे, तर सर्वसामान्यांसाठी रक्त सांडणारी आपली ‘शिवसेना’ आहे, हा फरक जनतेला माहीत आहे,” असा टोला त्यांनी लगावला. 17 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये भेटू; मराठवाड्याच्या हक्कासाठी लढा “येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मी स्वतः छत्रपती संभाजीनगरला येत असून तेथील आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यानंतर दसरा मेळाव्याला आपण सर्वजण नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कवर पुन्हा एकत्र येणार आहोत.” “आपल्याला सत्ता कशासाठी हवी आहे? गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि रोजगार या मूलभूत गरजा सर्वसामान्यांना पुरवण्यासाठी आपल्याला सत्ता हवी आहे. आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांची थेट कर्जमुक्ती केली होती; आजच्या सत्ताधाऱ्यांसारखा केवळ ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ असा भ्रष्टाचार आम्ही केला नाही,” असे सांगत त्यांनी बूथ स्तरावर पूर्ण ताकदीने कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. हेही वाचा… 4.5 लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याचं CET सेलने मान्य केलं: 850 कोटींच्या कंत्राटात मोठा मलिदा; रोहित पवारांचा थेट आरोप, कारवाईची मागणी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET Cell) कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील तब्बल साडेचार लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याची बाब खुद्द सीईटी सेलने मान्य केल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण परीक्षा पद्धतीत आणि कंत्राटात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संबंधित एज्युटेक कंपनी, तिचे संचालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लागेबांधे पुराव्यासह मांडत या संपूर्ण गैरप्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
भाजप अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन डावपेच खेळतंय:उद्धव ठाकरेंचा थेट हल्लाबोल, बीडच्या 250 BLA ना दिला 'मतदार यादी’चा मंत्र