Headlines

‘प्रिन्सिका जोशी’ बनून तरुणाची क्रिप्टोमध्ये दीड लाखांची फसवणूक:पुणे सायबर पोलिसांनी आरोपी कुणाल अदमानेला अटक केली; हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण




पुण्यात ‘प्रिन्सिका जोशी’ नावाचे बनावट स्नॅपचॅट खाते तयार करून एका तरुणाची क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पुणे शहर सायबर पोलिसांनी या प्रकरणी कुणाल जितेंद्र अदमाने (वय २५, रा. पर्वती परिसर, पुणे) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाला स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका जोशी’ नावाच्या खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. आरोपीने सुमारे सहा ते सात महिने स्नॅपचॅट आणि मोबाइल फोनवरून नियमित संपर्क साधत तरुणाचा विश्वास जिंकला. फोनवर बोलताना तो मुलीचा आवाज काढत असल्याने तरुणाला संशय आला नाही. विश्वास निर्माण झाल्यावर आरोपीने क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा आणि चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणाने आपल्या क्रिप्टो वॉलेटमधून आरोपीने दिलेल्या वॉलेटवर १,४६८ यूएसडीटी (अंदाजे दीड लाख रुपये) पाठवले. काही दिवसांनी तरुणाने गुंतवणुकीवरील परतावा आणि मूळ रक्कम मागितली. मात्र, आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर त्याने ‘प्रिन्सिका जोशी’ नावाचे स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम खाते बंद करून संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. सायबर पोलिसांनी स्नॅपचॅट आयडी, मोबाइल क्रमांक आणि तांत्रिक माहिती तपासली. यात बनावट खात्यामागे कुणाल अदमाने असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान आरोपीच्या आवाजातील संभाषण ऐकल्यावर तोच मुलीच्या आवाजात तरुणाशी बोलत असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. आरोपीने अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. अनोळखी व्यक्तींच्या आर्थिक आमिषाला बळी पडू नये आणि संशयास्पद प्रकार लगेच पोलिसांना कळवावा, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *