Headlines

नाशिकच्या रामकुंडात मोठी दुर्घटना!:गोदावरीत स्नान करताना मुंबईची 5 मुले बुडाली ; चौघांना वाचवले, एकाची प्रकृती चिंताजनक




गोदावरी नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने रामकुंड परिसरात शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. मुंबईहून धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या सुमारे 40 जणांच्या ग्रुपमधील पाच मुले गोदावरी नदीत स्नान करत असताना अचानक पाण्यात बुडाली . जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य करत चौघांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, एका सुमारे 12 वर्षीय मुलाला बराच वेळ पाण्यात राहावे लागल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान रामकुंड परिसरात घडली. मुंबईतील घाटकोपर परिसरातून काही कुटुंबीय आणि पर्यटक नाशिकला आले होते. गोदावरी नदीत स्नान करून परिसरातील धार्मिक स्थळांना भेट देण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. रामकुंड परिसरात आल्यानंतर गटातील काही महिला, पुरुष आणि लहान मुले चक्रधर स्वामी मंदिरासमोरील गोदावरी नदीपात्रात उतरली. मात्र, गेल्या काही दिवसांतील पावसामुळे नदीत पाण्याची पातळी वाढली असून प्रवाहही वाढलेला आहे. पाण्यात उतरल्यानंतर मुलांना नदीची खोली आणि प्रवाहाचा अंदाज आला नाही. काही क्षणांतच पाच मुले पाण्यात बुडू लागली. मुले पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच आदिवासी जीवरक्षक दलाचे सदस्य आणि पंचवटी अग्निशमन केंद्रातील जवान घटनास्थळी पोहोचले.बचाव पथकाने तातडीने पाण्यात उतरून चार मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मात्र, सुरुवातीला एका मुलाच्या वाहून गेल्याचे लक्षात आले नव्हते. त्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला. अर्ध्या तासानंतर मुलाचा शोध; रुग्णवाहिकेलाही अडथळे वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेतल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने त्याला गांधी तलाव परिसरातून बाहेर काढण्यात आले. तो बराच वेळ पाण्यात असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिला डॉक्टरने प्रसंगावधान दाखवत मुलांवर तातडीने उपचार सुरू केले. पाण्यातून बाहेर काढलेल्या मुलांना सीपीआरसह प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनंतर जखमी मुलांना रुग्णालयात नेण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड आणि परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. नदीपात्रालगत खोदकाम करण्यात आल्याने या भागात चारचाकी वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिणामी, काही मुलांना तातडीने उपचारासाठी अन्य वाहनांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. रामकुंडात सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा या दुर्घटनेनंतर रामकुंड परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गोदावरी नदीला पाण्याचा जोरदार प्रवाह असताना नागरिकांना आणि पर्यटकांना खोल पाण्यात जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुले नदीत उतरत असताना सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केला असता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी नदीकाठावर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, दुर्घटना घडली त्या वेळी सुरक्षारक्षक घटनास्थळी उपस्थित होते का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच नदी परिसरातील सुरक्षेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रामकुंड हे नाशिकमधील प्रमुख धार्मिक स्थळ असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. मात्र, पावसाळ्यात नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाह अचानक वाढू शकतो. त्यामुळे नदीत उतरताना विशेष काळजी घेणे आणि लहान मुलांना एकट्याने पाण्यात जाऊ न देणे आवश्यक आहे. या दुर्घटनेमुळे रामकुंड परिसरात काही काळ खळबळ उडाली असून, बुडालेल्या मुलांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा.. संभाजीनगरातील 4 हजार मंदिरांच्या दानपेट्यांतील हिशेब द्यावा लागेल:‘धर्मादाय’चे आदेश, मुस्लिम धार्मिक स्थळे वगळली शहर आणि जिल्ह्यातील चार हजारांपेक्षा अधिक मंदिरांमधील दानपेट्यांचा संपूर्ण ताळेबंद आता धर्मादाय कार्यालयाला सादर करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी दानपेटी आहे आणि सर्वसामान्य भाविकांना प्रवेश आहे, त्या प्रत्येक मंदिराला आता कायद्याच्या चौकटीत आणत धर्मादाय सहआयुक्तांनी कठोर पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे, मंदिराच्या नावावर भाविकांकडून अनधिकृत वाहनतळ (पार्किंग) शुल्क उकळणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांनाही आता या रकमेचा पैन‌्पैचा हिशेब द्यावा लागणार आहे.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *