Headlines

हिंजवडी मेट्रो सुरू होण्यास उशीर:माजी आमदार मोहन जोशींचा मुख्यमंत्र्यांना सवाल, केवळ आश्वासने नको, मेट्रो कधी धावेल ते सांगा




महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी हिंजवडी मेट्रो कधी धावणार, असा सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष मेट्रो कधी सुरू होईल, हे सांगावे, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार जेव्हा पिंपरी चिंचवड भागाला भेट देतात, तेव्हा ते हिंजवडी आयटी पार्कमधील सुविधांबाबत आश्वासने देतात, असा अनुभव आहे. हिंजवडीतील अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, सध्याचा शासकीय कारभार पाहता, हे रस्ते प्रत्यक्षात पूर्ण होण्यासाठी ३ ते ४ वर्षांचा कालावधी लागेल, असे जोशी म्हणाले. हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतुकीचा प्रश्न खूप गंभीर झाला आहे. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि रहिवाशांच्या सहनशक्तीच्या पलीकडे हा प्रश्न गेला आहे. त्यामुळे अजून वेळ न घालवता हिंजवडी मेट्रो लवकर सुरू करावी, अशी आमची स्पष्ट मागणी आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले. शिवाजीनगर ते हिंजवडी पुणे मेट्रो मार्गिका ३ च्या पहिल्या टप्प्याला मेट्रो सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. मेट्रोच्या सर्व चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. ही सर्व तयारी झालेली असतानाही मेट्रो का सुरू होत नाही, असा प्रश्न जोशींनी विचारला. महामेट्रोच्या वेळापत्रकानुसार, या चालू वर्षातील मार्च महिन्यापूर्वीच मेट्रो सुरू होणे अपेक्षित होते. ही मुदत संपून त्यावर पाच महिने उलटले तरी मेट्रो धावू लागलेली नाही. मेट्रो प्रशासनाच्या मते, तांत्रिक बाबी पूर्ण करून ३१ मे पूर्वीच मेट्रो धावू शकली असती. मग भाजप सरकारने मेट्रोला हिरवा कंदील दाखवायला इतका वेळ का लागला, असा प्रश्न उपस्थित होतो. भाजपला उद्घाटनाच्या निमित्ताने प्रसिद्धी मिळवायची आहे, म्हणूनच मेट्रो थांबवली आहे का, असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे, असेही जोशी म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *