![]()
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १४ वर्षांनंतर डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार पुन्हा सुरू केले आहेत. संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ४२ शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. पाटील म्हणाले की, सांस्कृतिक पैलू आणि तर्कावर आधारित विधायक प्रथा-परंपरांमागील विज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. चांगले संस्कार रुजवण्यासाठी शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षणही आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. जे.पी. नाईक यांचे शिक्षण, संशोधन, शिक्षक प्रशिक्षण, ग्रामविकास आणि आरोग्य क्षेत्रातील मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचे अभ्यासक आणि आंतरभारती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी नाईक यांच्या नावाने शिक्षक पुरस्कार सुरू करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने पुरस्कार सुरू करताना आनंद होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. किशोर इंगळे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर आणि सचिव प्रफुल्ल पवार उपस्थित होते. तसेच, राज्यातील विविध महाविद्यालयांचे पुरस्कार विजेते प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यापीठाचे कर्मचारीही उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले की, पुरस्कारांसाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या शिफारशीचा विचार केला नाही. केवळ गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. मोठ्या व्यक्तिमत्त्वांची माहिती आजच्या पिढीला नसणे हे दुर्दैव आहे, असे पाटील म्हणाले. कर्तृत्वासोबत नम्रपणाही वाढवला पाहिजे. शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातील शिकवण्यापुरती मर्यादित नसून ते सामाजिक नेतृत्वही करतात. आज विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाचे मोठे भांडार असले तरी शिक्षकांचे महत्त्व कमी झालेले नाही, उलट त्यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान न देता, अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि जीवनमूल्यांचा अभ्यासक्रमातून परिचय करून देण्याची गरज आहे. गणेशोत्सव केवळ डीजेपुरता मर्यादित न राहता त्यातील सांस्कृतिक व धार्मिक पैलू नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असेही पाटील यांनी सांगितले.
Source link
14 वर्षांनंतर शिक्षक पुरस्कार पुन्हा सुरू:42 शिक्षकांचा सन्मान; चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अंतर्मुख होऊन विचार करणाऱ्या शिक्षणाची गरज