![]()
दहीहंडी असो, गणेशोत्सव असो किंवा दुर्गोत्सव, डीजेच्या दणदणाटामुळे नेहमीच ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादा ओलांडल्या जातात. यामुळे कानठळ्या बसवणारा गोंगाट होतो आणि आजूबाजूचे वातावरण थरथरते. याचा परिणाम रुग्ण, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे पुणे आणि नागपूरमध्ये यावर्षी डीजेविना उत्सव साजरे करण्याची तयारी सुरू आहे. याच धर्तीवर आता अमरावतीतही डीजे बंदीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अखिल भारतीय नौजवान सभेचे पदाधिकारी शाहीर धम्मा खडसे, किसान सभेचे उमेश बनसोड आणि ‘आम्ही सारे’चे प्रदीप पाटील यांनी हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही स्थानिक संस्था आणि संघटनाही यात सहभागी झाल्या आहेत. गणेशोत्सव हा सर्वधर्मीयांना एकत्र आणणारा उत्सव असल्याने तो थांबायला नको. मात्र, मंडळांमध्ये अधिक खर्च करण्याची स्पर्धा करण्याऐवजी हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, असा त्यांचा आग्रह आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने या नव्या परंपरेची सुरुवात याच उत्सवापासून व्हावी, असा प्रयत्न सुरू आहे. डीजेला पर्याय म्हणून संबळ, हलगी, झांज, लेझीम, ढोल-ताशा, शहनाई, पिपाणी, पारंपरिक बँड आणि मर्यादित आवाजातील बँजो संच यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पारंपरिक वाद्यांमुळे उत्सवाचा मूळ बाज कायम राहील आणि ध्वनिप्रदूषणही कमी होईल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. उत्सवांच्या काळात अनेकदा नकळतपणे आवाजाची मर्यादा ओलांडली जाते. प्रशासन आणि न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळले जात नाहीत. यामुळे मिरवणुका रस्त्यावरून जात असताना रुग्णालयातील रुग्ण, घरातील वृद्ध नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. यापूर्वी असे परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव किंवा इतर सण साजरे करताना डीजेचा दणदणाट टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असा विचार पुढे आला आहे. आता अमरावतीकर याला किती प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. डीजे सिस्टिमच्या वाढत्या वापरामुळे एकेकाळी मिरवणुकीत आकर्षण असलेले पारंपरिक बँड आणि झांज पथकांची लोकप्रियता कमी झाली होती. त्यांना पुन्हा संधी मिळाल्यास, विशिष्ट पोशाखातील कलाकारांकडून सादर होणाऱ्या जुन्या लोकप्रिय गीतांच्या धून, भक्तिगीते आणि वाद्यसंगीताला आजही लोकांची पसंती मिळू शकते. यामुळे पारंपरिक बँड पथकांना पुन्हा प्रोत्साहन मिळेल.
Source link
पुणे, नागपूरनंतर अमरावतीत डीजे बंदीची तयारी:गणेशोत्सवात ढोल-ताशा, संबळ, हलगी, झांज, लेझीम, शहनाईला प्राधान्य देण्यावर जोर