Headlines

नागपूरच्या 145 वर्षांच्या मारबत महोत्सवाला सुरुवात:यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी मनपाचे विशेष प्रयत्न; 11 सप्टेंबरला मुख्य उत्सव




नागपूरचा १४५ वर्षांचा ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ रविवारपासून सुरू झाला. नागपूरची ही एक खास सांस्कृतिक ओळख आहे. यंदा हा उत्सव फक्त शहरातच नाही, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने तयारी केली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते काळी आणि पिवळी मारबत यांची पूजा करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. मुख्य मारबत उत्सव ११ सप्टेंबरला (शुक्रवारी) होणार आहे. यावर्षीच्या महोत्सवात विविध देशांचे प्रतिनिधी, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना बोलावण्यात आले आहे. मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, मारबत परंपरा शहरातून वाईट गोष्टी आणि रोगराई दूर पळवण्याचे प्रतीक आहे. राज्य सरकार या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरचा वारसा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काळी मारबत ते पिवळी मारबत असा खास ‘हेरिटेज वॉक’ आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे नेतृत्व करणाऱ्या आर्किटेक्ट मंदिरा नेवारे यांचा सत्कार करण्यात आला. ‘बडग्या’ या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या राहुल जांभूळकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. दरम्यान, सोशल मीडियावर मारबत पाहण्यासाठी तिकीट लागेल अशा चर्चा पसरल्या होत्या. यावर मनपा स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी स्पष्ट केले की, मारबत पाहण्यासाठी कोणतेही तिकीट ठेवण्यात आलेले नाही. मनपाने फक्त इच्छुक नागरिकांसाठी टी-शर्ट आणि बँड उपलब्ध केले आहेत, जे खरेदी करणे ऐच्छिक आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *