Headlines

जरांगेंच्या उपोषणस्थळाजवळच ओबीसींचे बेमुदत प्रतिआंदोलन:मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको, ओबीसी नेत्यांचा एल्गार




मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आता ओबीसी समाजानेही त्याच गावात प्रतिआंदोलनाचे आव्हान दिले आहे. जरांगे यांच्या आंदोलनस्थळापासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या सोनियानगर भागात ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाणे, विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारपासून उपोषण सुरू केले आहे. एकाच गावात दोन परस्परविरोधी आंदोलने सुरू झाल्याने गावात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा समाजाला आतापर्यंत 22 लाख कुणबी दाखले देऊनही सरकार जरांगेंच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे जरांगे यांच्या मागण्यांसाठी पायघड्या घालत असून जात पडताळणी समित्यांनी फेटाळलेली प्रमाणपत्रे वैध करण्यास दबाव आणला जात असल्याचा दावा ओबीसी आंदोलकांनी केला. ओबीसी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आरक्षणावरून आत्महत्या केलेल्या ओबीसी तरुणांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत व कुटुंब सदस्याला सरकारी नोकरी द्यावी. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता केवळ कायदेशीर चौकटीतच निर्णय घ्यावा. प्रत्येक जिल्ह्यात नोडल ऑफिसर नेमण्याचा निर्णय बेकायदा तो तात्काळ रद्द करावा. शासनाची किंवा ओबीसींची मंत्रिमंडळ समिती आमच्याकडे येते का हे आता आम्ही पाहू. स्टेज उभारण्यास पोलिसांचा विरोध- ॲड.ससाणे उपोषणासाठी स्टेज उभारण्यास पोलिसांकडून विरोध होत असल्याचा आरोप ॲड. मंगेश ससाणे यांनी केला आहे. उपोषणाचे ठिकाण अन्यत्र हलवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *