Headlines

पुस्तकांशी मैत्री करा; मोबाईलचा अतिवापर टाळा- लांडगे:सुजन कट्ट्याच्या पुस्तक परिचय स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; 16 शाळांतील 127 विद्यार्थ्यांचा सहभाग‎




जीवनाला सर्वांगीण समृद्धी आणि योग्य दिशा देणाऱ्या पुस्तकांपासून विद्यार्थ्यांनी अंतर ठेवू नये. स्पर्धेच्या युगात मोबाईलचा अतिवापर टाळून पुस्तकांशी मैत्री करावी. पुस्तकांच्या सहवासातून विचारांची समृद्धी होऊन जीवनाला योग्य वळण मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य शिरीष लांडगे यांनी केले. नेवासे शहरातील ‘सुजन कट्टा’च्या वाचन समृद्धी उपक्रमांतर्गत आयोजित पुस्तक परिचय स्पर्धेतील विजेत्यांना ज्ञानोदय स्कूलच्या कै. आशाबाई सुभाष अष्टेकर सभागृहात बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून प्राचार्य लांडगे बोलत होते. तालुक्यातील १६ शाळांमधील १२७ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तब्बल ९४ पुस्तकांचे रसग्रहण करून त्यातील आशय, विचार आणि जीवनमूल्ये परीक्षकांसमोर प्रभावीपणे मांडली. लांडगे म्हणाले, नवीन पिढीसमोर अनेक आकर्षणे आहेत. मात्र मोबाईल बाजूला ठेवून पुस्तकांशी दोस्ती केली तर विचारांची बैठक तयार होईल. सुजन कट्ट्याचा वाचनाची गोडी लावण्याचा प्रयत्न अनुकरणीय आहे. प्रमुख पाहुणे भास्करराव शिंदे यांनी सृजन परिवाराचा उपक्रम विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता समाजाला दिशा देणारा असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयीन गटात गणेश अवताडे, वैभवी सलालकर, वैष्णवी जावळे व वैष्णवी जमदाडे यांनी यश मिळवले. शालेय गटात श्रावणी पिसाळ, ज्ञानेश्वरी खेडकर, पर्णवी परभणे, विनायक कोरेकर, ईश्वरी खटके, रोहन गायकवाड, अमित उपळकर व अनन्या धांडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यावेळी महेश मापारी, नीलेश जोशी, डॉ. शंकरराव शिंदे, सतीश मुळे, कुणाल मांडण, सतीश पिंपळे आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा. किशोर धनवटे व डॉ. निर्मला सांगळे यांनी काम पाहिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *