.

रोजगार हमीच्या कायद्यामुळे गोरगरीब कष्टकऱ्यांना हक्काचे चार घास मिळाले; मात्र या कायद्याच्या निर्मितीमागील इतिहास रक्तरंजित आहे. १९७१ मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात रोजगाराच्या मागणीसाठी वैराग येथे काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आठ जण हुतात्मा झाले होते. या हुतात्म्यांच्या स्मृती जागविण्यासाठी गेल्या ५६ वर्षांपासून वैरागमध्ये हुतात्मा दिनानिमित्त मूकमोर्चा काढून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. रविवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजता खंडोबा वेस ते हुतात्मा स्मारक असा सुमारे अडीच किलोमीटरचा मूकमोर्चा काढण्यात आला. आठ हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
हुतात्मा स्मारकाजवळ बोलताना उपसभापती संतोष निंबाळकर म्हणाले, १९७१ मध्ये (कै.) चंद्रकांत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चावेळी तीन वेळा आंदोलकांसमोर जीवघेणे प्रसंग निर्माण झाले होते. त्या काळातील वैराग गोळीबाराची घटना नव्या पिढीला समजावी आणि हुतात्म्यांच्या त्यागातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने दरवर्षी हुतात्मा दिनानिमित्त मूकमोर्चा काढून त्यांना अभिवादन केले जाते. सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.अरुण सावंत, जिवाजीराव पाटील, मनोज डुरे-पाटील, उपसभापती बाबा गायकवाड, विनायक देशमुख, तात्यासाहेब करंडे, संचालक नेताजी घायतिडक, बापुसाहेब बुरगुटे उपस्थित होते.
दूषित भावनेने गोळीबाराचे आदेश जिवाजीराव पाटील म्हणाले, १९७१ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. रोजगाराच्या मागणीसाठी त्यावेळी बार्शी तहसील कार्यालयावर दोन वेळा मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर तिसरा मोर्चा वैराग येथील शासकीय गोदामावर काढण्यात आला. यावेळी तत्कालीन पोलिस अधीक्षक डेमला यांनी आंदोलकांवर दूषित भावनेने गोळीबार करण्याचे आदेश दिले.
हे आठ जण झाले होते हुतात्मा वैराग येथील गोळीबाराच्या घटनेत एकनाथ साळुंके (वैराग), चतुर्भुज विठ्ठल ताकभाते (श्रीपतपिंपरी), रघुनाथ गणपती माने (रातंजन), उद्धव श्रीपती गोफणे (हळदुगे), इब्राहिम चाँद शेख (वैराग), बब्रुवान तुळशीराम माळी (मानेगाव), भास्कर बाबुराव वाळके (मानेगाव) आणि सुंदराबाई लक्ष्मण चव्हाण (वैराग) या आठ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत ५४ जण जबर जखमी झाले होते. या हुतात्म्यांच्या स्मृती आजही वैरागकरांनी जपल्या असून, दरवर्षी मूकमोर्चाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले जाते.