Headlines

'विकास हवा, विनाश नको!':हजारो झाडांच्या कत्तलीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यावरणप्रेमींचे मूक आंदोलन




दौलताबाद रोडवर एका बाजूला कटर आणि अजस्त्र मशीनचा धडधडाट सुरू असताना, दुसऱ्या बाजूला झाडांच्या कत्तलीविरोधात पर्यावरणप्रेमींच्या बुलंद घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाने (सा.बा.) सुरु ठेवलेल्या या वृक्षतोडीविरोधात विविध संस्थांच्या ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचतर्फे रविवारी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) या प्रक्रियेवर ताशेरे ओढून नोटीस बजावलेली असतानाही बेकायदेशीरपणे महावृक्षांचा कत्लेआम सुरु असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात नागरिक, उद्योजक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अश्रू आणि पुष्प अर्पण करून झाडांना निरोप आंदोलकांनी कत्तल झालेल्या झाडांना पुष्प आणि हार अर्पण करून भावूक निरोप दिला. हातात ऑक्सिजन मास्क, ‘Don’t Cut Trees, Double The Bus’ आणि ‘विकास हवा, विनाश नको’ असे फलक घेऊन आंदोलकांनी घोषणाबाजी केली. “आम्हाला झाडांचे महत्त्व कळते, मग तुम्हाला का नाही?” असा सवाल चिमुकल्यांनी विचारत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. ६० मीटरच्या हव्यासापोटी पर्यावरणाचा विध्वंस उपस्थितांशी संवाद साधताना रूपेश कलंत्री म्हणाले, “आम्हा कोणाचाही विकासाला विरोध नाही, पण हा विध्वंस आम्ही सहजासहजी स्वीकारणार नाही. ६० मीटर रस्ता रुंदीकरणाच्या हव्यासापोटी हे कधीही भरून न निघणारे नुकसान केले जात आहे. लष्कराने आपली जागा अद्याप दिलेली नसल्यामुळे पडेगाव भागात शेवटी वाहतुकीची कोंडीच होणार आहे. याऐवजी सा.बा. विभागाने आधी दिलेला ३० मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव स्वीकारल्यास अर्धी झाडे वाचतील आणि रस्त्याचा प्रश्नही सुटेल.” डॉ. किशोर पाठक आणि रवी चौधरी यांनी प्रशासनाचे यापूर्वीचे वृक्ष पुनर्रोपनाचे (Transplantation) दावे फसव ठरल्याची आठवण करून दिली. पुढील कत्तल रोखण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन “आज आपण गप्प राहिलो तर आज दौलताबाद रोडवर झाडे तोडली जात आहेत, उद्या खुलताबाद, गरवारे स्टेडियम, घाटी रुग्णालय आणि जलसंपदा विभागाच्या परिसरातील झाडांवर कुऱ्हाड चालवली जाईल,” असा इशारा देत ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचने नागरिकांना दौलताबाद रोडवर येऊन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनात ॲड. निरंजन देशपांडे, प्रीती शाह, निधी पंत, रजनी सेठी, उद्योजक शिरीष कुलकर्णी, मनोज शहा, महादेव कल्याणी यांच्यासह ‘प्रयास’, ‘औदुंबर फाऊंडेशन (कला कट्टा)’, ‘उलुलू’ आणि ‘इको सत्व’ या संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *