![]()
बदलत्या काळानुसार आपली जीवनशैली वेगाने बदलत आहे, पण या धावपळीत आपल्या नात्यांवर नेमका काय परिणाम होतोय? कधी कधी एका छोट्याशा संशयामुळे नात्यांची कशी कोंडी होते आणि विश्वासाचा धागा कसा कमकुवत होतो, हे आपण अनेकदा पाहतो. याच नाजूक, संवेदनशील नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर थेट भाष्य करणारा एक अत्यंत सुंदर चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे, ज्याचं नाव आहे ‘अडकित्ता’. आता या ‘अडकित्त्यात’ अडकलेल्या पात्रांना पडद्यावर हुबेहूब जिवंत करणारे आपले सर्वांचे लाडके कलाकार सई ताम्हणकर, सखी गोखले आणि या सुंदर कथेचे शिल्पकार म्हणजेच चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष परंदकर आज आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडूनच या चित्रपटाविषयी जाणून घेऊया… सई, या ‘अडकित्त्यात’ अडकलेल्या भूमिकेचा कोणता भावनिक पैलू तुला सर्वात जास्त भावला? आणि एकूणच तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? सई ताम्हणकर म्हणाली की, मातृत्वाचाच पैलू आहे जो खूप महत्त्वाचा असतो. माझी भूमिका यात बेबी सीटरची आहे. बाळ सांभाळणाऱ्या मावशी, काकू, ताई तिची भूमिका माझी आहे. तर हा वेगळाच अनुभव होता, असा अनुभव मी आजूबाजूला नाही पाहिलेला. पण ते बिल्ड करायला, अशू बरोबर, सखी बरोबर आणि सिद्धार्थसोबत खूप मजा आली. तसेच सई ताम्हणकरला आपण नेहमीच एका वेगळ्या हटके किंवा डॅशिंग लुकमध्ये पाहत आलो आहोत. मात्र, या चित्रपटात तिची भूमिका एकदम संवेदनशील आहे. याबद्दल बोलताना सई म्हणाली, मी या भूमिकेला प्रेमाने स्वीकारले, अभिनेत्यांना वेगवेगळ्या भूमिका करायला कायम मजा येते. आणि जेवढे प्रेमाने तुम्ही स्वीकारता तेवढी ती मजा येते. मी मंगलने आणि मंगलने मला खूप प्रेम केले आहे. (सई ताम्हणकरने चित्रपटात मंगलची भूमिका केली आहे.) सखी, नात्यातील ही भावनिक गुंतागुंत पडद्यावर साकारताना तुला कोणती आव्हाने आली? यावर बोलताना सखी गोखले म्हणाली, आव्हान हे होते की हा अनुभव मी स्वतःहून घेतलेले नाही. त्यामुळे हे मला उसने घेऊन सादर करावे लागले मला. त्यात मला एक नट म्हणून मजा आली. मला असे वाटते की तो अनुभव प्रत्यक्षात न घेता तो घेता येणे, या सारखी आनंदाची गोष्ट नाही. दिग्दर्शक आशुतोष परंदकर सर, ‘अडकित्ता’ हे नाव कसे सुचले आणि या चित्रपटातून प्रेक्षकांना नेमका काय संदेश मिळेल? अडकित्ता हे एकदम अॅप्ट नाव आहे या कथेला आणि ही कथा माझ्या मित्राने लिहिली आहे. ज्यावेळा त्याने ही कथा लिहिली होती त्यावेळी त्याने अडकित्ता या नावानेच ही कथा लिहिली होती. ही पात्र कशी एकमेकांमध्ये अडकतात, नात्यांमधील गुंतागुंत, त्यांच्या आयुष्यात कसे प्रसंग घडतात, हे सगळे त्यात होते आणि हे नाव अगदी चपखल त्यात बसते. हा चित्रपट बघितल्यावर तुम्हाला समजेल की यातले पात्र एकमेकांना पूरक पण आहेत आणि अडकलेले पण आहेत. आजच्या तरुणाईला किंवा जोडप्यांना हा ‘अडकित्ता’ किती रिलेट होईल असं वाटतं? म्हणजे प्रोफेशनल लाइफ आणि पॅरेंटिंग, यात समतोल कसा राखता येईल? यावर मला तुम्हा संगळ्यांकडूनच थोडक्यात ऐकायला आवडेल. यावर उत्तर देताना दिग्दर्शक आशुतोष परंदकर म्हणाले, माझ्या मते हे सगळ्यांनाच रिलेट करणारे आहे. पूर्वी आपल्या साहित्यात असे उल्लेख असायचे की संसाराचा गाडा आहे, एक याने ओढायचे आणि एक त्याने ओढायचे वगैरे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता सगळे गाडे सगळ्यांनाच ओढावे लागणार. त्यामुळे आज जे कोणी काम करत आहेत त्या सगळ्यांनाची ही गोष्ट रिलेट करेल. पुढे बोलताना सखी गोखले म्हणाली की, दोघांची इच्छा असते काम करायची आणि कोणा एकावर घर चालवणं, मुल वाढवण हे आता ईकॉनॉमिकली शक्य नाही. त्यासाठी आधारस्तंभ लागतात. आणि त्या अर्थाने पाहिले तर अत्यंत रिलेट होणारी गोष्ट आहे. पॅरेंटिंग हे दोन जणांचे काम आहे. वर्षानुवर्ष मुल वाढवण्याची जबाबदारी ही आईवर पडत होती आणि कामावण्याची जबाबदारी वाडिलांवर पडत होती. कुठलही काम कमी कष्टाचे आहे असे मी म्हणत नाही. पण एखादे मुल परिपूर्णपणे वाढवण्यासाठी दोघांचाही हातभार लागणे गरजेचे असते. अडकित्ता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 मराठीवर 11 सप्टेंबर रोजी येणार आहे. तरी सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा असे आवाहन चित्रपटातील कलाकारांनी दिव्य मराठी डिजिटलसोबत दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
Source link
सई, सिद्धार्थ आणि सखी घेऊन येताहेत नातेसंबंधांची एक संवेदनशील कथा:नात्यांची कसोटी पाहणारा 'अडकित्ता'; 11 सप्टेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला