Headlines

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी सुरक्षा त्रुटी:बनावट PMO अधिकारी आणि सशस्त्र अंगरक्षकाला अटक




मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (NMACC) परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कार्यक्रमापूर्वी सुरक्षेतील एका मोठ्या त्रुटीमुळे खळबळ उडाली आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही स्वतःला पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) वरिष्ठ अधिकारी सांगणारा एक भामटा आणि त्याच्या सशस्त्र अंगरक्षकाला मुंबई पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरून शिताफीने ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे व्हीव्हीआयपी (VVIP) सुरक्षेत तैनात असलेल्या यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. बनावट ओळखपत्र आणि बंदुकधारी अंगरक्षक मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या मुख्य संशयिताचे नाव रोहन पारेख (वय 24 वर्षे) असे आहे. रोहन पारेख हा एनएमएसीसी संकुलात अत्यंत रुबाबात वावरत होता आणि स्वतः पंतप्रधान कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता. विशेष म्हणजे, त्याच्या संरक्षणासाठी त्याने स्वतःसोबत एक खासगी अंगरक्षकही (बॉडीगार्ड) ठेवला होता. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा दल (SPG) आणि मुंबई पोलिसांकडून परिसरात कडक तपासणी सुरू होती. त्यावेळी रोहन आणि त्याच्या अंगरक्षकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना रोखले. चौकशीदरम्यान रोहनने पोलिसांना पंतप्रधान कार्यालयाचे ओळखपत्र दाखवले; मात्र सूक्ष्म तपासणीअंती ते ओळखपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. झडती घेतली असता त्याच्या अंगरक्षकाकडे एक लोड केलेली बंदूक (पिस्तूल) मिळून आल्याने सुरक्षा अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. व्हीव्हीआयपी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या अनुषंगाने बीकेसी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि कडक सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यात आला होता. अशा अत्यंत संवेदनशील ठिकाणी एक 24 वर्षांचा युवक बनावट ओळखपत्र आणि शस्त्रासह थेट कार्यक्रमाच्या आवारात कसा काय पोहोचला, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी या सुरक्षा त्रुटीने यंत्रणांच्या कारभारावर प्रश्न निर्माण केले आहेत. तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सुपूर्द घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास तात्काळ मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडे (Crime Branch) सोपवण्यात आला आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणाही या तपासात सहभागी झाल्या आहेत. रोहन पारेख याने हे बनावट ओळखपत्र कुठून मिळवले, त्याचा कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यामागील मूळ हेतू काय होता, आणि यामागे कोणती टोळी किंवा षड्यंत्र आहे का, या दिशेने गुन्हे शाखा दोन्ही संशयितांची कसून चौकशी करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *