Headlines

गांजा तस्करीतील फरार आरोपीला 4 महिन्यांनंतर अटक:वेशभूषा बदलून सोशल मीडियापासून दूर होता; आईला भेटायला येताच पोलिसांच्या जाळ्यात




गांजा तस्करी प्रकरणात गेले चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर परिसरात ही कारवाई करण्यात आली. अजय पोपटराव पाडुळे (वय ३०, रा. नवीन म्हाडा वसाहत, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पाडुळे आणि त्याचा साथीदार चारुदत्त चव्हाण यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गांजा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. चव्हाण याच्याकडून ३५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाडुळे फरार झाला होता. तपासात पाडुळे हा शहरात गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गेले चार महिने तो पोलिसांना सापडत नव्हता. पाडुळे याने आपली वेशभूषा बदलली होती, तसेच तो सोशल मीडियाचा वापर करत नसल्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. पाडुळे हा म्हाडा वसाहतीत आपल्या आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार, संदीप आगळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पाडुळे याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, लोणी काळभोर आणि वानवडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे आणि तो या गुन्ह्यातही फरार आहे. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, मितेश चौधरी, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर यांनी ही कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *