Headlines

तृतीयपंथी सई भराट यांना 'केशव सन्मान पुरस्कार' देण्यात आला:'मी आजही भिक्षुकी करते, हा पैशांचा नाही, अस्तित्वाचा विषय'




पुण्यात तृतीयपंथी हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या सई राजेंद्र भराट (सई नगरकर) यांनी आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “माझा समुदाय खूप संघर्षातून इथपर्यंत पोहोचला आहे. मी आजही भिक्षुकी करते. हा पैशांचा विषय नाही, तर माझ्या अस्तित्वाचा आहे.” त्यांनी प्रश्न विचारला, “मला तिसऱ्या क्रमांकाचे स्थान दिले जाते, पण पहिले आणि दुसरे कोण आहेत? हे क्रमांक ठरवणारे कोण? मी तुमच्यासारखाच आहे, तुमचाच एक भाग आहे. मी वेगळा नाही. माझे मन, भावना आणि संवेदना तुमच्यासारख्याच आहेत.” सई भराट पुढे म्हणाल्या, “तुम्ही माझ्याकडे एकतर्फी दृष्टीने पाहता, हे खूप वेदनादायक आहे. काही लोक मला वेगळ्या वर्गात ठेवतात. अशा वेळी मला त्यांना विचारावेसे वाटते, जर मी तिसऱ्या वर्गात असेन, तर पहिल्या वर्गात कोण आहे? स्त्री की पुरुष? आणि प्रत्येक व्यक्तीचा वर्ग ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” पुण्यातील टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात हा कार्यक्रम झाला. हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक असलेल्या केशव शंखनाद पथकाच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त सई भराट यांना ‘केशव सन्मान पुरस्कार २०२६’ देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक सन्मानासाठी तसेच धार्मिक व सामाजिक प्रबोधनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. चिदंबरमेश्वर महाराज साखरे (श्री गुरु साखरे महाराज साधक आश्रम, आळंदी) होते. यावेळी केशव शंखनाद पथकाचे संस्थापक अध्यक्ष नितीन महाजन, किशोर चव्हाण, पथकाचे सचिव रणजीत हगवणे, काळूराम डोमाळे, शीला गिरमे, अरुण कापसे, सुहास मदनाल, प्रमोद डोंगरे, शैलेंद्र भालेराव, महेंद्र बेचवडे यांच्यासह पथकाचे संचालक मंडळ उपस्थित होते. सई भराट पुढे म्हणाल्या, “समाजापासून वंचित घटकाला तुम्ही आपलेसे केले, सन्मानित केले. ज्या सनातन धर्माने माझ्या समुदायाला सन्मान दिला, त्यांच्यासाठी बोलणे हे माझे कर्तव्य आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “जिथे कुठे अन्याय किंवा चुकीची घटना घडत असेल आणि माझ्या लक्षात येत असेल, तिथे त्याविरोधात आवाज उठवणे हे माझे कर्तव्य आहे. जी व्यक्ती भिक्षुकी करते, तिने प्रत्येकाच्या दारात जाऊन धर्माची बाजू मांडणे, धर्माबद्दल सांगणे आणि धर्माचा विचार पुढे नेणे, हेच खरे धर्मकार्य आहे.” ह. भ. प. चिदंबरमेश्वर महाराज साखरे यांनी यावेळी सांगितले की, “समस्या मांडणाऱ्यांची संख्या मोठी आहे; मात्र त्यावर उपाय सांगणारे कमी आहेत. सनातन धर्माने जितक्या प्रकारची चिकित्सा स्वीकारली, तितकी व्यापकता जगातील अन्य कोणत्याही धर्माने स्वीकारली नाही.” ते म्हणाले, “असे असतानाही आपल्या धर्माविषयी बोलणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. मंदिरांमध्ये प्रबोधन, समाजाचे एकत्रीकरण आणि धर्मजागरण झाले पाहिजे. काही ठिकाणांहून केवळ आदेश निघतात; मात्र आपल्यात संवादाचा अभाव आहे. घरात, कुटुंबातही संवाद राहिलेला नाही.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *