![]()
पुणे येथील कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका शाळकरी मुलीचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी कपिलामृत डेअरीजवळ यूटर्न घेताना दुचाकीला कंटेनरने धडक दिली. या अपघातात प्रतिभा नाईक या मुलीचा मृत्यू झाला. तिची बहीण वैष्णवी नाईक आणि वडील किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून,त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक कुटुंब दुचाकीवरून कात्रज-कोंढवा रस्त्याने जात होते. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ते कपिलामृत डेअरीजवळ पोहोचले. वडिलांनी दोन्ही मुलींसह दुचाकीला यूटर्न घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कात्रजकडून कोंढव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेमुळे दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर पडले. यात प्रतिभा नाईक कंटेनरच्या पुढील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना प्रतिभाचा मृत्यू झाला. वैष्णवी नाईक आणि तिच्या वडिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कंटेनर (क्रमांक एच आर 38 डब्ल्यू 6977) आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक एम एच 12 झेड एम 3579 आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावर मोठ्या वाहनांची वर्दळ असते. यूटर्नच्या ठिकाणी वारंवार अपघात होतात. या घटनेमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Source link
कात्रज-कोंढवा रस्त्यावर कंटेनरखाली चिरडून शाळकरी मुलीचा मृत्यू:यूटर्न घेताना दुचाकीला कंटेनरची धडक; वडील आणि दुसरी मुलगी किरकोळ जखमी