![]()
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले व उपोषण मागे घेण्याची देखील विनंती केली. मात्र जरांगे पाटील आपल्या सर्व मागण्यांवर ठाम असून उपोषण सुरूच ठेवले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत जरांगे पाटील जी भाषा वापरत आहेत, त्यावरून सरकारकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘जशास तसे उत्तर देऊ, सांगून टाका त्याला’, अशा शब्दांत मंत्री भरत गोगावले यांनी तर ‘आम्ही देखील रस्त्यावर उतरू’, असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांनी मनोज जरांगे यांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, हैदराबाद गॅझेट असेल, आरक्षण वगैरे ठीक आहे. मात्र आमच्या नेत्यांवर बोलतील तर कोणताही नेता सहन करणार नाही. एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिले, शिंदे साहेबांनी मागे पुढे पाहिले नाही, 5 हजार 300 जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. सारथीला न्याय दिला गेला, असे म्हणत गोगावले यांनी म्हटले आहे. जशास तसे उत्तर देऊ, सांगून टाका त्याला पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले, मनोज जरांगे राजकारणावर बोलले तर आम्ही पण उत्तर देऊ, आम्ही पण मराठे आहोत, आमच्यावर पण केसेस आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी बोलत असाल तर जशास तसे उत्तर देऊ, सांगून टाका त्याला, रायगडाच्या मावळ्याचा हा इशारा आहे, अशा शब्दांत गोगावले यांनी इशारा दिला आहे. आमच्या नेत्यांबद्दल बोलणार असाल तर आम्ही पण रस्त्यावर उतरू- सरनाईक मनोज जरांगे यांचे उपोषण सुरूच असून मुंबईत कूच करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांना विचारले असता ते म्हणाले, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. मात्र हे मान्य केले पाहिजे की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून दिले तेवढे कोणत्याही नेत्याने मराठा समाजाला दिले नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठ्या प्रमाणात दिले आहे. कोणाच्या तोंडातले काढून द्या, तर ते कसे मान्य होईल? आम्ही तुम्हाला साहेब म्हणून बोलतो, आम्ही पण कार्यकर्ते आहोत. मात्र आमच्या नेत्यांबद्दल बोलणार असाल तर आम्ही पण रस्त्यावर उतरू शकतो, अशा शब्दांत सरनाईक यांनी जरांगे यांना इशारा दिला आहे. तसेच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Source link
'जशास तसे उत्तर देऊ, रायगडाच्या मावळ्याचा इशाराय हा':शिंदे-फडणवीसांबद्दल एकेरी भाषेवरून भरत गोगावलेंचा मनोज जरांगेंना इशारा