Headlines

आमच्या भविष्यासाठी आरक्षणाचा प्रश्न सोडवा‎:मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांनी फलक घेऊन तहसील कार्यालयावर काढला मोर्चा, दिल्या घोषणा




आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, मराठा समाजाला आरक्षण झालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे… म्हणत विद्यार्थ्यांनी मंगळवेढ्यातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अकरा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शासनाने मराठा समाजाच्या सर्व मागण्या तातडीने मान्य करून मनोजदादा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी विद्यार्थ्यांच्या वतीने मंगळवेढा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात शिवप्रेमी चौकातील शिवतीर्थापासून करण्यात आली, ही रॅली संत दामाजी रोड, दामाजी चौक, अण्णा भाऊ साठे चौक मार्गे तहसील कार्यालयात समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे, अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. मोर्चानंतर प्रभारी तहसीलदार बाळू ताई भागवत यांना निवेदन देण्यात आले. शासनाने विद्यार्थ्यांच्या तसेच मराठा समाजाच्या भवितव्याचा गांभीर्याने विचार करून आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि मनोजदादा जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांचे आमरण उपोषण सोडवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी यावेळी मांडली. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले असून, शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सकल मराठा समाज, मंगळवेढा शहर व तालुका यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. मोहोळ । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील खंडाळी, आष्टी, शेटफळ, बैरागवाडी आदी गावांमध्ये ग्रामस्थांनी मंगळवारी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला.या बंदला गावातील व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक तसेच विविध घटकांनी सहभाग घेत प्रतिसाद दिला. गावातील किराणा दुकाने, हॉटेल्स, विविध व्यवसाय व इतर आस्थापने बंद ठेवून ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हा बंद शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने पाळण्यात आला. सकाळपासूनच खंडाळी, आष्टी, शेटफळ, बैरागवाडी आदी गावातील बाजारपेठेसह व्यावसायिक परिसरात सर्व व्यवहार बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रतिनिधी | अकलूज मराठा आरक्षण व त्या अनुषंगिक मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ माळशिरस तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने येथील उप विभागीय कार्यालयासमोर मंगळवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यामध्ये ३५ आंदोलकांनी सहभाग घेतला होता. माळशिरस तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ६ दिवसांचा एल्गार पुकारला असून त्यानुसार रविवारी वेळापूर,सोमवारी अकलूज येथे रास्ता रोको आंदोलन तर मंगळवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्याचा भाग म्हणून रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत वेळापूर येथे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यासाठी उप विभागीय कार्यालयासमोर शिव छत्रपती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी जय भवानी जय शिवराय तसेच एक मराठा कोटी मराठा, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढे हम तुम्हारे साथ हैंच्या घोषणांनी मराठा सेवकांनी परिसर दणाणून सोडला होता. याठिकाणी मराठा सेवकांनी आपली मते प्रदर्शित करत शासनाने मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा काढून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवावे, असे आवाहन करत अन्यथा लाखोंच्या संख्येत मुंबईत येण्याचा इशारा दिला. आंदोलकांनी सायंकाळी पाच वाजता आंदोलन आटोपते घेतले. मंगळवेढा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा सकल मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी हातातील फलक दाखवून भाविष्याला प्रश्न करते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *