![]()
एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील 25 वर्षीय तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नारायण पेठ परिसरात घडली. प्रथमेश दिलीप देशमुख (मूळ रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. आर्थिक अडचणींमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. प्रथमेश मागील दीड ते दोन वर्षांपासून पुण्यात राहत होता. तो पुण्यात राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. मात्र, काही काळापासून त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याने काही व्यक्तींकडून पैसे उधार घेतले होते.कर्ज फेडणे आणि पुण्यातील राहण्याचा खर्च भागवणे त्याला कठीण जात होते. त्यामुळे त्याने पुणे सोडून गावी जाण्याचा विचारही केला होता. त्याच्या खोलीचे भाडेदेखील थकले होते. दरम्यान, प्रथमेशने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, जी पोलिसांना सापडली. या चिठ्ठीत आर्थिक अडचणी आणि त्याने ज्या व्यक्तींकडून पैसे घेतले होते, त्यांच्या व्यवहारांचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी नारायण पेठ पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. प्रथमेशवर नेमके किती कर्ज होते, त्याने कोणाकडून पैसे घेतले होते आणि आत्महत्येमागे दुसरे कोणते कारण आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. सुसाईड नोटमधील उल्लेखांच्या आधारे संबंधित व्यक्तींचीही चौकशी केली जाऊ शकते.
Source link
एमपीएससी करणाऱ्या तरुणाची पुण्यात आत्महत्या:अडीच लाखांच्या कर्जामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय; सुसाईड नोटमध्ये उल्लेख