![]()
गोंडवाना विद्यापीठाच्या ‘एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात’ समन्वयक म्हणून आत्मसमर्पित नक्षलवादी मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठा असंतोष पसरला आहे. नक्षलवादी हिंसाचारात निष्पाप कुटुंबीयांना गमावलेल्या नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी या निर्णयावर मोठा आक्षेप घेतला आहे. वाढता विरोध पाहून विद्यापीठ प्रशासनाने या नियुक्तीवर स्पष्टीकरण देत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्राच्या कामासाठी तीन समन्वयक नेमण्याचा निर्णय 9 जुलै 2026 रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी समन्वयक पदासाठी थेट मुलाखतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखालील मुलाखत समितीने 14 ऑगस्ट रोजी मुलाखती घेतल्या. यात डॉ. सतीश गोगुलवार आणि डॉ. नरेश मडावी हे सदस्य होते. 29 ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर करून भूपतीची तीन महिन्यांसाठी समन्वयक म्हणून कंत्राटी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे भामरागड तालुक्यातील नक्षल पीडितांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. भामरागडच्या जिजागाव येथील ग्रामसभा सदस्य सिताराम मडावी यांनी सांगितले की, गेल्या 40 वर्षांपासून या नक्षलवाद्यांनी आमच्या छातीवर बंदुका रोखल्या, धमक्या दिल्या आणि आमच्या जवळच्या निष्पाप लोकांची हत्या केली. अनेक महिलांना विधवा आणि मुलांना अनाथ करणाऱ्या नक्षलवादी टोळीतील व्यक्तीला आज आमचा समन्वयक म्हणून नेमले जात आहे. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीकडून आम्ही काय शिकायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ग्रामस्थांच्या मते, भूपतीच्या पुनर्वसनाला किंवा त्याला अन्य कोणतेही काम देण्यास विरोध नाही. मात्र, थेट ग्रामसभांशी आणि गावकऱ्यांशी संबंधित असलेल्या संवेदनशील पदावर त्याची नियुक्ती करणे हे निष्पाप पीडितांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. याविरोधात भामरागड तालुक्यातील 123 गावांच्या ग्रामसभा प्रतिनिधींनी एकत्र येत 6 सप्टेंबर रोजी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पुढील 15 दिवसांत ही नियुक्ती रद्द न झाल्यास संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ‘महाग्रामसभा’ बोलावून मोठे आंदोलन करण्याचा इशारा इंदारशाह आलाम यांनी दिला आहे. चौफेर टीकेनंतर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी खुलासा करत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. वेणुगोपाल यांची नियुक्ती केवळ तीन महिन्यांच्या करारावर करण्यात आली असून त्यांच्याकडे फक्त कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी असणार आहे. ग्रामसभांमध्ये किंवा प्रशिक्षण वर्गांमध्ये कोणत्याही विषयाचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे.
Source link
निष्पाप आदिवासींचा जीव घेणाऱ्या भूपतीच्या नियुक्तीवरून 123 ग्रामसभांचा एल्गार:चौफेर टीकेनंतर गोंडवाना विद्यापीठाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न