Headlines

मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ:अनमॅपिंगद्वारे 3 कोटी मतदारांवर अन्याय', काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप




काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मतदार याद्यांमधून लाखो मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. एसआयआर (SIR) प्रणालीच्या माध्यमातून सरकारने ‘अनमोली’ आणि ‘एएसडी’ (ASD) नावाचा भस्मासूर तयार करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू केल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. मतदार यादीतील घोळ: 30 टक्के मतदार वगळले? सपकाळ यांनी आकडेवारी मांडताना सांगितले की, “विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात 9 कोटी 78 लाख मतदार होते. मात्र, एसआयआर मॅपिंगमधून सुमारे 2 कोटी 6 लाख मतदारांना गैरहजर, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASD) या शीर्षकाखाली वगळण्यात आले आहे. तर 1 कोटी 22 लाख मतदारांना ‘अनमॅप’ च्या नावाखाली संशयाच्या भोवऱ्यात टाकले आहे. अशाप्रकारे तब्बल 3 कोटी 28 लाख (सुमारे 30 टक्के) मतदार यादीतून वगळण्याचा मोठा घोळ सरकारने घातला आहे.” हा ‘बंगालचा पॅटर्न’ महाराष्ट्रात राबवला जात असून, या 1 कोटी 22 लाख मतदारांची यादी अद्याप निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेली नाही, असे सपकाळ म्हणाले. “यादी नसताना हरकती घ्यायला सांगणे हा उलटा न्याय आहे. या याद्या तत्काळ बूथनिहाय आणि ग्रामपंचायत स्तरावर प्रकाशित कराव्यात आणि हरकतींची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवावी,” अशी मागणी त्यांनी केली. प्रथमेश देशमुख आत्महत्येला सरकारच जबाबदार पुण्यात एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याच्या आत्महत्येला थेट राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. “एमपीएससीमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणावर सरकार कारवाई करत नाही. एमपीएससी अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत. मात्र, त्यांची नियुक्तीच मुळात भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी झाली होती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इथेनॉल, साखर आणि शेतकऱ्यांची फसवणूक साखर उद्योगाबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की, “या फसव्या सरकारने इथेनॉलचे धोरण राबवून उद्योजकांचे खिसे भरले. आता साखरेचा हंगाम सुरू होत असताना भाव कमी करून आणि रिकव्हरीचे निकष लावून ते पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत.” मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या कारवरून निशाणा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एका महागड्या स्पोर्ट्स कारमधील फोटो व्हायरल झाल्यावरूनही सपकाळ यांनी टीकास्त्र सोडले. “दोन-तीन कोटींच्या या कारची मालकी कोणाची आहे? या गाडीला नंबर प्लेट होती का? सीट बेल्ट लावला होता का? जर वाहतूक नियमांची पायमल्ली झाली असेल, तर पोलिसांनी किती दंड वसूल केला?” असे सवाल त्यांनी विचारले. “दुसऱ्यांवर रामशास्त्री बाण्याचा आव आणणाऱ्या फडणवीसांच्या काळात राज्याचा गृह विभाग ‘पांडू हवालदार’ चालवतोय की काय?” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके करपली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. “पाऊस पाडण्यासाठी क्लाउड सीडिंगसारख्या प्रयोगांवर सरकार खर्च करत नाही, पण कुंभमेळ्यात सीसीटीव्ही लावण्यासाठी 350 कोटी रुपये मंजूर केले जातात. सरकारने तातडीने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व वसतिगृह शुल्क माफ करावे,” अशी आग्रही मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. हेही वाचा… जमिनीचा जुना इतिहास ते रेडी रेकनरचा दर: एका क्लिकवर मिळणार सगळी माहिती, महसूलमंत्री बावनकुळेंनी सुरू केले ‘महाभूमी स्टॅक’ राज्यातील जमिनीच्या खरेदी-विक्री आणि इतर सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने ‘महाभूमी स्टॅक’ नावाचे एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार (ॲप) विकसित केले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. याचबरोबर, राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे आणि जमिनीचे मालकी हक्क देण्यासाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान एक विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *