Headlines

बिडकीनमध्ये चार तास रास्ता रोको:टोलनाका हटवण्यासह तीन प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांचा तीव्र जनआक्रोश




छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडवरील बिडकीन येथे उभारण्यात येत असलेला टोलनाका गावातून हटवावा, बिडकीन येथे बायपास करण्यात यावा आणि बिडकीनला महानगर निगम प्राधिकरणातून वगळण्यात यावे, या तीन प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी (9 सप्टेंबर) बिडकीन येथे तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडवरील बिडकीन येथे टोलनाका उभारण्याचे काम सुरू आहे. हा टोलनाका गावाच्या परिसरातच उभारला जात असल्याने बिडकीनकरांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. टोलनाका गावात उभारू नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला यापूर्वी अनेकदा निवेदने देण्यात आली होती. मात्र, टोलनाका उभारणीचे काम सुरूच राहिल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर रास्ता रोको आंदोलन करत टोलनाका गावातून इतरत्र हलवण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. वाढत्या वाहतुकीमुळे बायपासची मागणी बिडकीन परिसरात डीएमआयसीमुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून, भविष्यात या भागात मोठ्या वाहनांची आणि इतर वाहतुकीची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिडकीन गावातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडवर भविष्यात अपघातांची शक्यता वाढू शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. ही परिस्थिती लक्षात घेता बिडकीन येथे स्वतंत्र बायपास तयार करण्यात यावा, अशीही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. महानगर निगम प्राधिकरणातून बिडकीनला वगळण्याची मागणी शासनाने बिडकीनचा महानगर निगम प्राधिकरणामध्ये समावेश केल्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक आणि प्रशासकीय बोजा टाकला जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे बिडकीनला महानगर निगम प्राधिकरणातून वगळण्यात यावे, अशी तिसरी प्रमुख मागणी करण्यात आली. या तीन प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे सचिव अमोल नरवडे यांच्या नेतृत्वाखाली निलजगाव फाटा, बिडकीन येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बिडकीनकरांच्या हितासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. आंदोलनात उबाठा गटाचे जिल्हा परिषद सदस्य मनोज पेरे, युवा शिवसेनेचे काकासाहेब टेके, बिडकीनचे सरपंच अशोक धर्मे, तसेच विकास गोरडे, हसन चाऊस, कृष्णा चौथमल आणि डॉ. गणेश शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. चार तास आंदोलन; दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा आंदोलनाची पूर्वकल्पना प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, महानगर निगमचे अधिकारी वेळेवर आंदोलनस्थळी न पोहोचल्याने रास्ता रोको जवळपास चार तास सुरू राहिला. दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंगळवारी बिडकीनचा आठवडी बाजार असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ होती. त्यात दुसऱ्या दिवशी पोळ्याचा सण असल्यामुळे सणासाठी खरेदी करणाऱ्या नागरिकांचीही मोठी गर्दी होती. रास्ता रोकोमुळे अनेक चाकरमानी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्रशासनाकडून आश्वासन आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अनिकेत कुलकर्णी यांनी टोलनाका हलवण्यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले. या प्रस्तावावर लवकरच निर्णय होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. महानगर निगमच्या साटोटे यांनी ग्रामस्थांनी दिलेले निवेदन शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच महानगर निगमचे उपायुक्त चव्हाण यांनी दूरध्वनीवरून १६ सप्टेंबर रोजी प्राधिकरणाच्या स्टँडिंग कमिटीची बैठक होणार असून, त्या बैठकीत बिडकीनला महानगर निगम प्राधिकरणातून वगळण्याची मागणी मांडण्यात येईल, असे सांगितले. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलनाचा समारोप करण्यात आला. मात्र, तीन्ही प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात महिलांसह बिडकीन परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिडकीन पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हेही वाचा.. गर्भलिंग तपासणीची तक्रार; अरबट सोनोग्राफी केंद्राला भेट:खामगावात जिल्हा शल्यचिकित्सकांकडून चौकशी‎ येथील अरबट सोनोग्राफी व एक्स-रे सेंटरमध्ये अवैध गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी आपल्या पथकासह सेंटरला भेट देत सोनोग्राफी मशीन, रुग्ण तपासणीच्या नोंदी तसेच विविध कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलेश टापरे हेही उपस्थित होते. ही कार्यवाही ७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *