Headlines

देऊळगाव राजात सराफ व्यावसायिकाचे भरदिवसा अपहरण:काही तासांतच धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा पोलिसांचे कनेक्शन उघड




बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात भरदिवसा घडलेल्या एका अपहरणाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तहसील कार्यालयासमोरून योगीराज ज्वेलर्सचे मालक आणि सराफ व्यावसायिक अनिरुद्ध शिंगणे यांना इनोव्हा कारमधून आलेल्या चार जणांनी जबरदस्तीने सोबत नेल्याची घटना घडली. दुपारी 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. सुरुवातीला व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच पोलिसांच्या तपासात या घटनेला अनपेक्षित वळण मिळाले. अपहरणासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार आढळून आली असून, संबंधित चार जण तेलंगणा पोलीस असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध शिंगणे हे देऊळगाव (मही) येथील रहिवासी असून देऊळगाव राजा येथे त्यांचा योगीराज ज्वेलर्स हा सराफा व्यवसाय आहे. याशिवाय ते बांधकाम व्यवसायाशीही संबंधित आहेत. सोमवारी दुपारी ते देऊळगाव राजा येथील तहसील कार्यालयासमोरील परिसरात असताना इनोव्हा कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांना ताब्यात घेतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. भरदिवसा आणि शहरातील वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. घटनेची माहिती मिळताच शिंगणे यांच्या नातेवाईकांनी देऊळगाव राजा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. चार जण इनोव्हा कारमधून आले आणि अनिरुद्ध यांना घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह संशयित वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने पथके रवाना केली. व्यावसायिकाचे अपहरण नेमके कोणत्या कारणातून झाले, त्यामागे आर्थिक व्यवहार किंवा अन्य काही वाद आहे का, याचाही तपास सुरू करण्यात आला. लव्हाळा फाट्यावर इनोव्हा कार आढळली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यानंतर अपहरणासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लव्हाळा फाटा येथे आढळून आली. देऊळगाव राजा पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली. वाहनाचा शोध लागल्यानंतर तपासाला वेग आला. दरम्यान, अनिरुद्ध शिंगणे हेही पोलिसांना सुरक्षित अवस्थेत आढळून आले. त्यामुळे सुरुवातीला अपहरणाची घटना वाटत असलेल्या या प्रकरणात वेगळीच माहिती समोर येऊ लागली. अपहरणकर्ते तेलंगणा पोलीस असल्याची माहिती या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा खुलासा म्हणजे अनिरुद्ध शिंगणे यांना घेऊन जाणारे चौघे जण तेलंगणा पोलीस असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, तेलंगणा पोलिसांनी शिंगणे यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात ताब्यात घेतले, त्यांच्याविरोधात काय कारवाई करायची होती आणि त्यांना तेलंगणात का घेऊन जात होते, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. विशेष म्हणजे, दुसऱ्या राज्यातील पोलिसांनी एका व्यापाऱ्याला ताब्यात घेताना स्थानिक पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेलंगणा पोलिसांची ही कारवाई नेमकी कोणत्या प्रक्रियेनुसार करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक पोलिसांना माहिती न देता संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन जाण्याच्या प्रकारामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे संकेत या प्रकरणाची माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की, तेलंगणा पोलिसांनी कोणतीही माहिती न देता अनिरुद्ध शिंगणे यांना ताब्यात का घेतले, याची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित व्यक्ती आणि ताब्यात घेणाऱ्या पोलिसांकडून आवश्यक माहिती घेतली जात आहे. संपूर्ण प्रकरणाची पडताळणी सुरू असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान, सध्या अनिरुद्ध शिंगणे आणि त्यांना ताब्यात घेणारे संबंधित पोलीस देऊळगाव राजा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. तेलंगणा पोलिसांनी कोणत्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही कारवाई केली, त्यांच्याकडे यासंदर्भात अधिकृत कागदपत्रे होती का आणि स्थानिक पोलिसांना माहिती का देण्यात आली नाही, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. एकीकडे सराफ व्यावसायिकाचे भरदिवसा अपहरण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तर दुसरीकडे अपहरणकर्तेच तेलंगणा पोलीस असल्याची माहिती समोर आल्याने या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. त्यामुळे हे अपहरण होते की दुसऱ्या राज्यातील पोलिसांची कारवाई, याचा उलगडा आता पुढील पोलीस तपासातून होणार आहे. हेही वाचा…. कर्जमाफीच्या यादीतून कोणीही सुटणार नाही:मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची ग्वाही; वारसांची नावे नोंदवण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, कर्जमाफीच्या यादीतून एकाही शेतकऱ्याचे नाव सुटणार नाही आणि या निर्णयाची शासनाकडून संपूर्ण अंमलबजावणी केली जाईल. सध्या प्रत्येक जिल्ह्यात 10 ते 15 हजार शेतकरी कुटुंबांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही ही वस्तुस्थिती त्यांनी मान्य केली. मात्र केवायसी पूर्ण करून लाभार्थींच्या याद्या तातडीने पुढे पाठवण्याचे काम वेगाने सुरू असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *