![]()
पुणे शहरात दहीहंडी उत्सवादरम्यान विनापरवाना लावणी कार्यक्रमांचे आयोजन केल्याप्रकरणी अनेक मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिबवेवाडी परिसरात नृत्यांगणा राधा पाटील यांच्यासह आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता धनकवडी परिसरातही दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये लावणी नृत्यांगणा, त्यांचे सहकलाकार आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. धनकवडीतील तीन हत्ती चौकात अष्टविनायक मित्र मंडळाने ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सवात नृत्यांगणा निशा मुंबईकर यांच्या लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. दहीहंडी उत्सवात अश्लील नृत्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच, कलाकारांना मुंबईतील रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र, आयोजकांनी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला नव्हता. आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे अष्टविनायक मंडळाचे अध्यक्ष पवन सूर्यकांत डोंगरे, सागर सोनवणे, नृत्यांगणा निशा मुंबईकर आणि त्यांच्या सहकलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक राहुल राठोड यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मिठारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. याच प्रकारे, धनकवडीतील रिस्की बॉईज ग्रुप (शिवराज मित्र मंडळ) यांनीही विनापरवाना लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष बंडू मडीवाल, उपाध्यक्ष मयूर भावेकर, नृत्यांगणा शुभांजली उर्फ शुभांगी थोरात यांच्यासह एकूण चार नृत्यांगणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोपान पाटोळे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक पाराध्ये तपास करत आहेत.
Source link
दहीहंडीत विनापरवाना लावणी कार्यक्रम:पुणे शहरात दोन नृत्यांगणांसह आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल