Headlines

अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणाऱ्या पालकांना 30 हजार दंड:नागपुरात 26 प्रकरणांत न्यायालयाचा निर्णय; वाहन परवाना 12 महिन्यांसाठी रद्द




अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देणे पालकांना चांगलेच महागात पडले आहे. नागपूर शहर वाहतूक विभागाने २०२६ मध्ये केलेल्या कारवाईनंतर २६ प्रकरणांमध्ये न्यायालयाने पालकांना दोषी ठरवले. या सर्व प्रकरणांमध्ये प्रत्येक पालकाला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, त्यांचा वाहन परवाना १२ महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. रस्ते अपघात थांबवण्यासाठी आणि अल्पवयीन चालकांना आवर घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ही विशेष मोहीम सुरू केली आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम १९९ (अ) नुसार २५ हजार रुपये दंड आणि कलम १९९ (४) नुसार १२ महिन्यांसाठी वाहन परवाना अपात्र ठरवण्याची कारवाई करण्यात आली. यामुळे प्रत्येक प्रकरणात पालकांना एकूण ३० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. अल्पवयीन मुलांमध्ये वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक आणि मानसिक परिपक्वता नसते. तरीही अनेक पालक आपल्या मुलांना सर्रास गाड्या चालवायला देतात, असे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दिलेला हा निर्णय निष्काळजी पालकांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. अल्पवयीन मुलांना वाहने चालवायला देणे हे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नाही, तर स्वतःच्या मुलांसह इतर निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहने चालवायला देऊ नयेत. भविष्यातही अशा पालकांवर आणि वाहनमालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नागपूर शहर वाहतूक विभागाने दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *