![]()
हिंगोली शहरातील एनटीसी भागामध्ये जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात तेथे एक पोलीस कर्मचारी आढळून आला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्याच्या निलंबनाच्या आदेश पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी नुकतेच काढले आहेत. हिंगोली शहरातील एनटीसी भागात नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने तसेच हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, उपनिरीक्षक गिरी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, दिलीप लेकुळे, शेख आवेज, गोपिनाथ घुगे, बाळासाहेब कांबळे, आकाश बोथीकर यांच्या पथकाने शनिवारी ता. ५ सायंकाळी छापा टाकला. यामध्ये घटनास्थळी १८ जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून २.१६ लाख रुपये रोख, एक कार, ८ दुचाकी वाहने, १५ मोबाईल असा १८.४७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात २३ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान जुगार खेळताना हिंगोली पोलिस दलातील पोलिस कर्मचारी विठ्ठल काळे यांनाही पकडण्यात आले होते. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला.याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस कर्मचारी काळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी काढले आहेत.
Source link
हिंगोलीत जुगार खेळताना पकडलेला पोलिस कर्मचारी निलंबित:पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश