गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांसह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने यंदा राज्यभर ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम राबविण्
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेश मंडळे, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि दाते यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा सुमारे 10 हजार सार्वजनिक गणेश मंडळांचा या उपक्रमात सहभाग राहणार आहे.
‘डॉक्टर आपल्या दारी’
गणेशोत्सवासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागातही आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
या शिबिरांमध्ये नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येईल. तपासणीदरम्यान एखाद्या व्यक्तीला आरोग्यविषयक समस्या आढळल्यास त्यांना पुढील तपासणी आणि उपचारांसाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टर किंवा रुग्णालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, शहरी आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य विभागांसह धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
कोणत्या आजारांची तपासणी होणार?
या आरोग्य शिबिरांमध्ये विविध आजारांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. यामध्ये हृदयरोग, किडनीचे आजार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूशी संबंधित गंभीर आजार आणि बालरोग यांसह इतर आरोग्य समस्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणीनंतर ज्या रुग्णांना पुढील उपचारांची गरज असेल, त्यांना योग्य रुग्णालयात संदर्भित केले जाणार आहे. पात्र रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर संबंधित शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गेल्या वर्षी मोठा प्रतिसाद
गेल्या वर्षी 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी राज्यभर 12,655 आरोग्य शिबिरे घेण्यात आली होती. या शिबिरांमध्ये तब्बल 7 लाख 4 हजार 73 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
यापैकी 18,800 रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले होते. याशिवाय 236 रक्तदान शिबिरांमध्ये 16,798 नागरिकांनी रक्तदान केले होते. गेल्या वर्षी मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे यंदा उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे.
यंदा 20 लाखांहून अधिक नागरिकांचे लक्ष्य
यंदा राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून, सुमारे 20 हजार आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून 20 लाखांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना त्यांच्या घराजवळच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा मिळणार असल्याने आजारांचे वेळेत निदान होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ 2026 : ठळक मुद्दे
राज्यभर 20 हजार मोफत आरोग्य शिबिरे
20 लाखांहून अधिक नागरिकांच्या तपासणीचे उद्दिष्ट
राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत उपक्रम
सुमारे 10 हजार सार्वजनिक गणेश मंडळांचा सहभाग
हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, किडनीविकार यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी
गरजेनुसार पुढील उपचारासाठी रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर व रुग्णालयांकडे संदर्भित केले जाणार
हेही वाचा..
मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ:अनमॅपिंगद्वारे 3 कोटी मतदारांवर अन्याय’, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मतदार याद्यांमधून लाखो मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. एसआयआर (SIR) प्रणालीच्या माध्यमातून सरकारने ‘अनमोली’ आणि ‘एएसडी’ (ASD) नावाचा भस्मासूर तयार करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू केल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. सविस्तर वाचा..