Headlines

जबलपूरचा ‘रोव्हर’ डायलिसिसच्या उंबरठ्यावरून पुण्यात वाचला:किडनीतील खडे आरआयआरएसने काढले; मोठी शस्त्रक्रिया टळली, क्रिएटिनिन 13.79 वरून 2.0 वर आले.




किडनी खराब होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला जबलपूरचा सात वर्षीय जर्मन शेफर्ड ‘रोव्हर’ पुण्यातील अत्याधुनिक पशुवैद्यकीय उपचारांमुळे पुन्हा आपल्या कुटुंबात परतला. किडनीची कार्यक्षमता वेगाने कमी होत असल्याने त्याला डायलिसिससाठी पुण्यात आणण्यात आले होते. मात्र, केवळ डायलिसिसवर भर न देता आजाराचे मूळ कारण शोधले. तपासणीत किडनी आणि मूत्राशयातील खडे हे किडनी खराब होण्यामागील प्रमुख कारण समोर आले. त्यानंतर मोठी शस्त्रक्रिया न करता आरआयआरएस (रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी) या अत्याधुनिक पद्धतीने किडनीतील खडे काढण्यात आले. पुणे स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकचे डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया झाली. रोव्हर पुण्यात दाखल झाला तेव्हा त्याची प्रकृती खूप गंभीर होती. त्याचे क्रिएटिनिन १३.७९, तर युरिया १२३.९ इतका वाढला होता. अशा स्थितीत थेट शस्त्रक्रिया करणेही धोक्याचे होते. त्यामुळे प्रथम औषधोपचार आणि आवश्यक वैद्यकीय व्यवस्थापन करून त्याची प्रकृती स्थिर करण्यात आली. रक्त तपासणी, क्ष-किरण आणि पोटाची सोनोग्राफी केल्यानंतर किडनी व मूत्राशयात खडे असल्याचे दिसून आले. किडनीतील खड्यांमुळे लघवीच्या प्रवाहात अडथळा येत होता आणि किडनीवर ताण येत होता. त्यामुळे खडे काढणे हा उपचाराचा महत्त्वाचा टप्पा ठरला. आरआयआरएसमध्ये शरीरावर मोठा काप न घेता नैसर्गिक मूत्रमार्गातून अतिशय बारीक लवचिक दुर्बीण किडनीपर्यंत पोहोचवली जाते. कॅमेऱ्याच्या मदतीने खडा शोधल्यानंतर सूक्ष्म लेझरच्या मदतीने त्याचे बारीक तुकडे केले जातात. कुत्र्याचा मूत्रमार्ग तुलनेने लहान असल्याने ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण होती. मात्र, योग्य नियोजन आणि आधुनिक उपकरणांच्या मदतीने प्रक्रिया यशस्वी ठरली. उपचारानंतर रोव्हरच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली. १३.७९ वर असलेले क्रिएटिनिन २.० आणि १२३.९ असलेले युरिया २२.९ वर आले. प्रकृती समाधानकारक झाल्यावर ९ ऑगस्टला त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता तो जबलपूरमध्ये कुटुंबासोबत असून त्याच्या किडनीच्या कार्यक्षमतेवर नियमित लक्ष ठेवले जात आहे. रोव्हरची पालक सेजल कुशवाहा यांनी सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून तो त्यांच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे. किडनी खराब होत असल्याचे आणि डायलिसिसची शक्यता असल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला होता. शक्य ते सर्व उपचार मिळावेत म्हणून त्याला जबलपूरहून पुण्यात आणले. उपचारानंतर तो पुन्हा घरी परतल्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मानवी वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी आरआयआरएससारखी अत्याधुनिक उपचारपद्धती आता योग्य निवड केलेल्या पशुरुग्णांमध्येही वापरता येत असल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले. प्राण्यांवरील गुंतागुंतीच्या उपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित तज्ज्ञ आणि योग्य रुग्णनिवड यांचे महत्त्व या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *