Headlines

मोहोळ यांचे चांदणी चौक मेट्रो डीपीआर तयार करण्याचे निर्देश:दिशा बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा; प्रलंबित कामांना गती देण्यास सांगितले.




केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यासोबतच चांदणी चौक, घोटवडे फाटा, पिरंगुट, हिंजवडी मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचेही आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजना आणि मागील बैठकीतील सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होते. आमदार भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, हेमंत रासने हे देखील बैठकीला हजर होते. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावांना गती देण्याचे निर्देश दिले. वनाज-चांदणी चौक उन्नत मार्गासाठी पुणे महापालिकेची आर्थिक सहमती मिळवावी. रामवाडी-वाघोली मार्गिकेच्या आराखड्याला आवश्यक मान्यता द्यावी. तसेच लोहगाव विमानतळ मेट्रो जोडणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल निश्चित मुदतीत पूर्ण करण्यास सांगितले. यावेळी त्यांनी चांदणी चौक, घोटवडे फाटा, पिरंगुट, हिंजवडी मेट्रोचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश पुन्हा दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या मार्गाला अनुमोदन देत तो आवश्यक असल्याचे सांगितले. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आले. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या वाढल्याबद्दल मोहोळ यांनी समाधान व्यक्त केले. प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अंतर्गत पुणे महापालिकेकडे ३,२२७ अर्ज पात्र ठरले आहेत. मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे व चोविसावाडी येथील सुमारे ६,८०० घरांशी संबंधित भूसंपादन आणि हस्तांतरणाची प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या पहिल्या टप्प्यातील ९१.५९ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३८,४६५ पैकी ९,२५८ घरे पूर्ण झाली असून, २९,२०७ घरे प्रगतीपथावर आहेत. प्रत्येक तालुक्याला मासिक उद्दिष्ट निश्चित करून कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *