![]()
पुणे शहराचा वेगाने विस्तार होत आहे. वाढत्या बांधकाम परवानग्या, उंच इमारती, अपुरे रस्ते, वाहतूक कोंडी, उद्याने आणि क्रीडांगणांची कमतरता यामुळे शहराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेवरही ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्याचा विकास सुनियोजित पद्धतीने होत आहे का, याचा आढावा घेण्यासाठी राजीव गांधी स्मारक समितीने शुक्रवारी (11 सप्टेंबर) एका परिसंवादाचे आयोजन केले आहे. हा परिसंवाद पत्रकार भवन, नवी पेठ येथे सकाळी 9.30 ते दुपारी 1 या वेळेत होईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सीओईपीचे माजी प्राध्यापक प्रताप रावळ, वास्तुविशारद मकरंद शेंडे, भोला वांजळे, आबा जगताप, संजय अभंग, नंदकुमार पापळ आणि अनिल धिमधिमे उपस्थित होते. शहराचा विकास नैसर्गिक रचना आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करून व्हायला हवा, असे तिवारी म्हणाले. पुण्यातील बांधकाम परवानग्यांची सध्याची पद्धत शहरातील वाहतूक व्यवस्थेला पूरक आहे का, तसेच यूडीसीपीआर आणि एचसीएमटीआरने सुचवलेले विकासाचे प्रारूप किती प्रभावी ठरले आहे, यावर परिसंवादात चर्चा होईल. क्रेडाईच्या अहवालानुसार, पुणे शहरात 93 हजारांहून अधिक घरे विक्रीविना उपलब्ध आहेत. एका बाजूला मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला असलेली घरे विकली जात नाहीत. हा शहरी नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असल्याचे आयोजकांनी सांगितले. वास्तुविशारद मकरंद शेंडे यांनी सांगितले की, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरात सुमारे ६ हजार कोटी चौरस फुटांची नवीन बांधकामे होणार असल्याचे म्हटले आहे. शहराचा विस्तार वाढत असताना लोकसंख्येची घनता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे प्रा. प्रताप रावळ यांनी लक्ष वेधले. या परिसंवादात माजी खासदार वंदना चव्हाण, माजी महापालिका आयुक्त महेश झगडे, पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवाडकर, प्रा. प्रताप रावळ, मकरंद शेंडे, संग्राम खोपडे, प्राजक्ता दिवेकर, वास्तुविशारद शिरीष केंभावी आणि सहकारी गृहनिर्माण सोसायटी महासंघाचे सुहास पटवर्धन सहभागी होतील. महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनातील अधिकारी, आजी-माजी आमदार आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलावले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.
Source link
पुणे शहराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह; परिसंवादाचे आयोजन:वाहतूक, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि उंच इमारतींच्या प्रश्नांवर शुक्रवारी चर्चा