![]()
शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेला पोळा उद्या, गुरुवार, १० सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. एकेकाळी अमरावती जिल्ह्यात पोळ्याच्या सणानिमित्त बैलांच्या सजावटीच्या साहित्यासाठी लाखोंची खरेदी-विक्री व्हायची. मात्र, यंदा पावसाची कमतरता आणि शेतीपिकांच्या नुकसानीमुळे या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. खरेदीसाठी बाजारात गर्दी कमी असल्याने बैलांच्या सजावटीची बाजारपेठ यंदा खूपच मंद दिसत आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांबद्दल आभार मानण्यासाठी शेतकरी पोळ्याच्या दिवशी त्यांना आकर्षक साहित्याने सजवतात. यासाठी मोरकी, वेसण, घुंगरू, कासरे, बाशिंग, झुल आणि रंगांची मोठी खरेदी केली जाते. अमरावती शहरातील मुख्य बाजारांसह विविध तालुक्यांच्या ठिकाणी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी विक्रेत्यांनी दुकाने लावली आहेत. पण, यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे आणि हातात पैसा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा खूप साधेपणाने सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ आवश्यक साहित्याचीच खरेदी केली जात आहे. महागाईमुळे सजावटीच्या वस्तूंचे दरही वाढले आहेत. त्यामुळे दरवर्षी गर्दीने भरलेल्या बाजारपेठेत यंदा उत्साह काहीसा कमी झाला असून, व्यापारी आणि शेतकरी दोघेही काळजीत आहेत. मोर्शी येथील व्यावसायिक नामदेवराव पिढेकर म्हणाले, “पोळा सण जवळ येण्याच्या महिनाभर आधीपासूनच बैलांच्या सजावटीचे साहित्य तयार करण्याचे काम सुरु होते. त्यासाठी नायलॉनची दोरी आणि कातड्याचा वापर करून बैलांच्या गळ्यातील पट्टे आणि बेरड्या तयार केल्या आहेत. हे साहित्य मी दोन दिवस आधीपासूनच बाजारात आणले. परंतु पावसाच्या कमतरतेमुळे चिंतेत असलेला शेतकरी ते खरेदी करण्यासाठी बाजारात फिरकला नाही.”
Source link
अवर्षणामुळे पोळ्याच्या उत्साहावर विरजण, बाजारपेठ मंदावली:एकेकाळी लाखोंची उलाढाल होणाऱ्या बैलांच्या सजावटीच्या साहित्याची खरेदी घटली