Headlines

करंजखेडला डेंग्यूने 12 वर्षांच्या बालकाचा मृत्यू:एकाच कुटुंबातील तिघांना होती डेंग्यूची लागण‎




कन्नड तालुक्यातील करंजखेड (सुराशेवाडी) येथील शेतकरी सुभाष तुळशीराम ससे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. डेंग्यूच्या संसर्गामुळे ससे कुटुंबातील १२ वर्षीय मुलगा सोहम ससे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर वडील आणि बहीण यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. सोहम याला तीव्र तापाची लक्षणे दिसून आल्याने २ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्याला डेंग्यूचे निदान झाले. याचदरम्यान त्याचे वडील सुभाष ससे आणि बहीण सप्तशोरी ससे यांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांनाही डेंग्यूच्या उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. एकाच वेळी तिघेही गंभीर आजारी असल्याने सोहमची आई समृद्धी ससे यांच्यावर मोठा कठीण प्रसंग ओढावला. दरम्यान, घटनेनंतर ग्रामविकास अधिकारी पंढरीनाथ मैंद, कर्मचारी दिलीप पवार आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी गावात कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. तसेच आरोग्य सेवकांनी घरोघरी जाऊन डास प्रतिबंधक उपाययोजना, स्वच्छता आणि कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे. ६ दिवसांनंतर सोहमवर केले अंत्यसंस्कार उपचारादरम्यान ४ सप्टेंबर रोजी सोहमचा मृत्यू झाला. वडील आणि बहीण दोघेही अतिदक्षता विभागात असल्याने हर्षवर्धन निकम, राहुल चौतमल, रामू गाढवे व योगेश खैरे यांच्या पुढाकाराने सोहमचा मृतदेह ६ दिवस रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवला. ८ सप्टेंबरला वडील व बहिणीला सुट्टी मिळाल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी करंजखेड येथे सोहमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोहम नेवपूर येथील जिल्हा परिषद शाळेत ८ व्या वर्गात शिकणारा हुशार विद्यार्थी होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *