Headlines

मानाच्या बैलासाठी लागते 11 ते 15 हजारांची बोली:परंपरेला मान, बैलजोड्यांचा सन्मान; कोटमगावी साजरा हाेताे आगळावेगळा सण‎




बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना शेतीशी जोडलेल्या पारंपरिक सणांचे महत्त्व मात्र कायम आहे. निफाड तालुक्यातील कोटमगावचा बैलपोळा त्याचीच आगळी झलक दाखवतो. येथे पोळ्याच्या मिरवणुकीत मानाच्या बैलाला प्रवेश देण्यासाठी बोली लावण्याची अनोखी परंपरा आजही जपली जात असून, त्यामुळे ग्रामीण संस्कृतीशी जोडलेले हे सणाचे स्वरूप अधिक ठळक होते. पोळ्याच्या मिरवणुकीच्या साधारण दोन तास आधी पंचकमिटीच्या वतीने बोली प्रक्रिया घेतली जाते. इच्छुक बैलमालक अनामत रक्कम भरून यात सहभागी होतात. दरवर्षी मान मिळवण्यासाठी अनेक बैलमालक उत्साहाने बोली लावतात. साधारणपणे ११ ते १५ हजार रुपयांपर्यंत बोली जाते. ज्या बैलाला मान मिळतो, त्याला इतर बैलजोड्यांपूर्वी गावच्या वेशीतून मिरवणुकीत प्रवेशाचा मान दिला जातो. मानाच्या बैलाला छबी, गोंडा, पितळी तोडा अशा पारंपरिक अलंकारांनी सजविले जाते. बैलाच्या मालकाला फेटा बांधून आयोजकांच्या वतीने सन्मानित केले जाते. आपल्या बैलाला पोळ्याचा मान मिळावा, यासाठी अनेक शेतकरी वर्षभर बैलांची विशेष निगा राखतात. पोळ्याच्या निमित्ताने सजावट, देखभाल आणि मिरवणूक यामुळे गावात उत्साहाचे वातावरण असते. हा आगळावेगळा पोळा पाहण्यासाठी कोटमगाव, लासलगाव, खानगाव, खडक, माळेगाव परिसरासह आजूबाजूच्या गावांतील शेतकरी व नागरिक उपस्थित राहतात. आधुनिकतेच्या प्रवाहातही कृषी संस्कृतीशी नाते जोडणारी ही परंपरा नव्या पिढीसमोर सकारात्मक आदर्श ठरत आहे. बोलीतून जमा होणारी रक्कम केवळ मानाच्या बैलापुरती मर्यादित राहत नाही. नवरात्रोत्सवात भवानी माता मंदिरातील होम-हवनाच्या विधीसाठी या रकमेतून योगदान दिले जाते. त्यामुळे पोळ्याची ही परंपरा धार्मिक आणि सामाजिक भावनेशी जोडली गेली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *