Headlines

मातीच्या गणेशमूर्तींतून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश:नैसर्गिक रंगांचा वापर करून साकारल्या आकर्षक मूर्ती‎




गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, खुलताबाद यांच्या वतीने बाजारसावंगी येथील ‘पीएम श्री’ जिल्हा परिषद शाळेत ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणे’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत माती आणि नैसर्गिक रंगांचा प्रभावी वापर करून आकर्षक, सुबक व रेखीव गणेशमूर्ती साकारल्या. माती मळण्यापासून ते मूर्तीला नैसर्गिक रंगांनी सजवण्यापर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने केली. ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया, निसर्गाचे रक्षण करूया’ असा ठाम संदेश या बालकलाकारांनी आपल्या कलाकृतींमधून दिला. शाडू मातीचे महत्त्व, जलप्रदूषणाचे घातक परिणाम आणि निसर्गाचा समतोल राखण्याची गरज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. हा उपक्रम विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण, छत्रपती संभाजीनगर) संदीप गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण झाला. बालवयातच पर्यावरण संवर्धनाचे संस्कार घडल्यास भविष्यात निसर्गपूरक संस्कृती अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक दहिफळे, सर्व शिक्षकवृंद तसेच खुलताबाद सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. वलथरे, वनपाल एस. आर. मोरे, विजय डिघोळे आणि वनरक्षक मोहिनी राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेशोत्सव श्रद्धेने साजरा करतानाच पीओपीऐवजी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करून जलप्रदूषण रोखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे नद्या व तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. प्रत्यक्ष कृतीतून शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. स्वतःच्या कल्पकतेचा वापर करत विद्यार्थ्यांनी विविध रूपांतील सुंदर बाप्पांच्या मूर्ती घडवल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *