![]()
पुण्यातील पेरूगेट पोलिस चौकीच्या हद्दीतून एका 28 वर्षीय तरुणाचे अपहरण झाले. डायल 112 वर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या 53 मिनिटांत तरुणाची सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रसाद सूर्यवंशी (वय 28) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री सुमारे 12:30 वाजता डायल 112 वर पोलिसांना कॉल आला. एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून प्रसाद सूर्यवंशी याचे अपहरण झाल्याचे या कॉलमध्ये सांगण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली आणि पाठलाग सुरू केला. रात्री 1:23 वाजता सिंहगड रोडच्या दिशेने जाणाऱ्या आरोपींच्या तावडीतून पीडित तरुणाची यशस्वी सुटका करण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी सागर रमेश बोराडे (वय 32, व्यवसाय- हॉटेल व्यावसायिक, रा. वालचंदनगर) आणि किशोर बाळासाहेब सावंत (वय 32, रा. दसर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पीडित तरुण प्रसाद आणि आरोपी सागर बोराडे यांची एक महिला मित्र हे तिघेही पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. पीडित तरुण आपल्या महिला मित्राशी बोलत असल्याच्या रागातून आरोपी सागरने त्याच्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने हे अपहरण केले. आरोपींनी प्रसादला मारहाण करत त्याच्याच स्कॉर्पिओ गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अपहृत तरुणाची सुटका केल्यानंतर त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी एकूण चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांव्यतिरिक्त उर्वरित दोन फरार साथीदारांचा पोलिस गांभीर्याने शोध घेत आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
Source link
पुण्यात मध्यरात्री थरार:मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून तरुणाचे अपहरण, नाकाबंदीमुळे अवघ्या 53 मिनिटांत सुटका