![]()
अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे पारंपरिक उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. शिवसेना नेते, आमदार तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बैलांचे पूजन करून शेतकरी आणि बैलांच्या अतूट नात्याचा सन्मान केला. शेतकऱ्याच्या कष्टात खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत दानवे यांनी बळीराजाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट येऊ दे, अशी प्रार्थना केली. यावेळी माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलपोळा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. गावकऱ्यांसोबत पोळा साजरा करण्यासाठी आपण मुद्दाम येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. बारसगावमधील पोळ्याच्या परंपरेचे कौतुक करताना दानवे म्हणाले की, या गावाकडून इतर गावांनीही आदर्श घेण्यासारखे आहे. अनेक ठिकाणी पोळ्याच्या वेळी मान-पानावरून वाद होताना दिसतात. मात्र, बारसगावमध्ये अशी मान-पानाची पद्धत नाही. गावातील सर्व शेतकरी आणि बैल एकत्र येऊन गावातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालतात. त्यामुळे गावातील एकोपा आणि परंपरा जपली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बैल हा शेतकऱ्याच्या शेतीचा महत्त्वाचा साथीदार आहे. वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून बैल मेहनत करतो. त्याच्या बळावर शेतकरी शेती करतो आणि आपला संसार चालवतो. त्यामुळे वर्षातून एकदा येणाऱ्या पोळ्याच्या दिवशी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा सण बैलांसाठी आनंदाचा आणि विश्रांतीचा दिवस असल्याचेही दानवे यांनी सांगितले. दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामातील पावसाच्या परिस्थितीवर दानवे यांनी चिंता व्यक्त केली. पाऊस कमी असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक भागांत पिके वाळून जात आहेत. मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांतही पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. पावसासाठी प्रार्थना करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही दानवे म्हणाले की, शेतकऱ्यावर अनेक संकटे असली तरी तो आपल्या परंपरा आणि सण उत्साहाने साजरे करतो. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असून पाऊस न झाल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कोरडवाहू शेतीतील पिकांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. काही ठिकाणी थोडीफार पिके तग धरून असली, तरी अनेक भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीत आता चांगल्या पावसासाठी प्रार्थना करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असेही अंबादास दानवे यांनी यावेळी म्हटले. संकटाच्या काळातही बळीराजा आनंदाने पोळा साजरा करत आहे, ही त्याच्या जिद्दीची आणि परंपरेवरील श्रद्धेची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील नात्याचा सन्मान करणारी महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. त्यामुळे ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जपली जावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. हेही वाचा..
जरांगेंच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस:जशी प्रवृत्ती, तशी माझी भाषा वापरावी लागते, शिंदेंवर बोलावं लागतं याचं मलाही दुःख पण शिरसाटांमुळे बोलावे लागते- मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. सलग 13 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्यागामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. काल तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले होते. सविस्तर वाचा..
Source link
बारसगावात अंबादास दानवेंच्या हस्ते बैलपोळा:पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता, म्हणाले – प्रार्थनेशिवाय पर्याय नाही