![]()
महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी सोनाली त्रिंबक कांबळे यांनी केली आहे. संतोष पंडित यांच्यावर तत्काळ कारवाई झाली, तशीच कारवाई गायकवाड यांच्यावरही व्हावी, असे म्हणत त्यांनी पोलिसांवर दुजाभावाचा आरोप केला. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील शिवीगाळ केली होती. या घटनेचा व्हिडिओ मोबाईलवर पाहिल्यानंतर आपल्या मनाला लज्जा वाटल्याचे सोनाली कांबळे यांनी सांगितले. या प्रकारानंतर सोनाली कांबळे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना अर्ज लिहून आणण्यास सांगितले. त्यांनी अर्ज दिल्यानंतरही त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली आणि पोलीस ठाण्यात अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पीआय साहेबांना प्रश्न विचारले आणि संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल होतो, तसा माझा गुन्हा तात्काळ नोंद करावा, अशी मागणी केली. मात्र, पीआय साहेबांनी गुन्हा नोंद होत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी डीसीपी साहेबांना फोन केला. डीसीपींनी दहा मिनिटांत फोन करतो असे सांगितले, पण अजून त्यांचा फोन आलेला नाही, असे कांबळे यांनी नमूद केले. हा चक्क दुजाभाव असल्याचे कांबळे म्हणाल्या. संतोष पंडित यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले, तेव्हा त्यांच्यावर लगेच गुन्हा दाखल झाला आणि त्यांना घरातून उचलण्यात आले. पण, आमदाराने अश्लील शिवीगाळ करून माता-भगिनींच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, तरीही पोलिसांकडून कोणतीही तत्परता दाखवली गेलेली नाही. हे अन्यायकारक असून, कोथरूड पोलिसांनी तात्काळ आपला गुन्हा नोंदवून आमदार संजय गायकवाड यांना जेलमध्ये टाकावे, अशी त्यांची मागणी आहे.
Source link
आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करून अटक करा:महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; सोनाली कांबळेंचा पोलिसांवर दुजाभाव केल्याचा आरोप