श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या १३४व्या गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा वृंदावन येथील प्रसिद्ध ‘प्रेम मंदिरा’ची भव्य प्रतिकृती गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. गणेश चतुर्थीला सोमवारी (१४ सप्टेंबर) सकाळ
.
वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याआधी सकाळी ८.३० वाजता फुलांनी सजवलेल्या मयूर रथातून श्रींची आगमन मिरवणूक निघेल. दुपारी १२ वाजल्यापासून भाविकांना दर्शन घेता येईल.
‘जिथे भक्ती प्रेम बनते आणि प्रेम देवत्व बनते’ या संकल्पनेवर आधारित प्रेम मंदिराची ही प्रतिकृती १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. संगमरवरी वास्तुकलेपासून प्रेरित रचना, कलाकुसरीचे खांब, घुमट, रासलीला, गोवर्धन लीला आणि झुला यांसारख्या कृष्णलीला दर्शवणारे शिल्पपट यात साकारले आहेत. राधा-कृष्णाची भव्य मूर्ती आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्री मंदिराचे रूप अधिक सुंदर दिसेल.

ऋषिपंचमीनिमित्त मंगळवारी (१५ सप्टेंबर) पहाटे ६ वाजता तब्बल ३५ हजार महिला सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करतील. तसेच दररोज महाअभिषेक, गणेशयाग, वेदपठण, सूर्यनमस्कार, अग्निहोत्र आणि महिला हळदीकुंकू असे विविध धार्मिक कार्यक्रम होतील. २४ सप्टेंबरला सामूहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन केले आहे. अनंत चतुर्दशीला (२५ सप्टेंबर) श्रींची सांगता मिरवणूक श्री वक्रतुंड रथातून निघेल.
‘जय गणेश आरोग्यसेवा’ अभियानांतर्गत तीन ठिकाणी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्रे उभारली जातील. गणपती मंदिराजवळ १० खाटांची व्हेंटिलेटर/आयसीयू सुविधा उपलब्ध असेल. ५५ वैद्यकीय तज्ज्ञांची टीम कार्यरत राहील. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पाच आणि ट्रस्टच्या चार रुग्णवाहिका मोफत सेवा देतील.
रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्ण आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना ऑगमेंटेड रियालिटीच्या माध्यमातून थेट बाप्पाचे दर्शन घडवले जाईल. व्यसनमुक्तीबाबतही जनजागृती केली जाईल.
उत्सव परिसरात १५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि २५० पुरुष-महिला सुरक्षारक्षक तैनात असतील. गणेशभक्तांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कॅन्टोन्मेंट हद्दीत ५० कोटी रुपयांचे विमा कवच घेतले आहे. अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख, अंशत: अपंगत्वासाठी दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांपर्यंत औषधोपचार खर्चाची तरतूद आहे. भाविकांना चार एलईडी स्क्रीन तसेच ऑनलाइन माध्यमांतूनही दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.