![]()
पोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैल धुण्यासाठी आजोबांसोबत गेलेल्या दोन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. 9) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील चांमणी शिवारात घडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. यश बबन साळवे (वय 9) आणि चेतन बबन साळवे (वय 11) अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे चांमणी परिसरात शोककळा पसरली असून साळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोळा सणासाठी बैल धुण्याच्या उद्देशाने यश आणि चेतन हे आजोबांसोबत चांमणी शिवारातील एका पाणवठ्यावर गेले होते. बैल धूत असताना दोन्ही बालके पाण्यात गेली. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.दोन्ही बालके पाण्यात बुडाल्याची बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रयत्न करून दोन्ही बालकांना पाण्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोन्ही बालकांना मृत घोषित केले. पोळ्याच्या सणाच्या दिवशीच दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चांमणी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साळवे कुटुंबीयांवर अचानक ओढवलेल्या या दुःखामुळे गावातील वातावरण शोकाकुल झाले आहे. दरम्यान, पाणवठे, तलाव, नदी-नाले आणि शेततळ्यांमध्ये पाण्याची खोली किंवा प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांनी अशा ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्यावी. तसेच त्यांना मोठ्यांच्या देखरेखीशिवाय पाण्याच्या ठिकाणी जाऊ देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. हेही वाचा.. MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य:मुख्यमंत्री फडणवीसांचे पेपर पुनर्तपासणीसह SIT चौकशीचे आश्वासन, 8 दिवसांत कारवाईचे आदेश राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या निकालावरून आणि कथित पेपरफुटीवरून आक्रमक झालेल्या MPSC विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ यांच्यात झालेली महत्त्वपूर्ण बैठक यशस्वी ठरली असून, विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पेपरची पुनर्तपासणी करण्याचे आणि पेपरफुटीच्या प्रकरणाची थेट ‘एसआयटी’ (SIT – विशेष तपास पथक) मार्फत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा..
Source link
बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू:चांमणी शिवारातील हृदयद्रावक घटना